तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या वलप गावात कॉलरा आणि गॅस्ट्रोची साथ उद्भवली असल्याचे पनवेलच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या साथीाने एका मुलाचा मृत्यू झाला असून ३१ जण आजारी आहेत. त्यापैकी दोन जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुका आणि ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे गावातील स्वच्छता आणि पाण्याच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष होत असल्याने साथीच्या आजार फैलावत असल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे.
वलप गावात साडेतीन हजार लोकवस्ती आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वावंजा येथे आरोग्य केंद्र आहे. गावात शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी आर्थिक परिस्थितीनुसार विंधनविहिरी बांधल्या आहेत. अशा सुमारे दोनशे खासगी विंधणविहिरी आहेत. परंतु या विहिरींच्याच शेजारी शौचालये बांधली गेली आहे. येथील सांडपाणी जमिनीत झिरपून या विहिरीतील पाण्यात मिसळत असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविला जातो. या विहिरीतील पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत व तालुका आरोग्य विभागाची आहे. परंतु ती तपासणी करण्याची प्रशासनाची मानसिकताच नाही, असे येथे सांगितले जाते. गावात जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करून नळयोजना राबविली. परंतु जलवाहिनी असलेल्या या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक विजेच्या पंपाचे बिल भरण्याची क्षमता वलप ग्रामपंचायतीमध्ये नसल्याने आजपर्यंत गावाला शुद्ध पाणी मिळू शकले नाही. शनिवारी अनेकांना उलटय़ा, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला रविवारी जाग आली. रविवारी सरकारी सुट्टीचा दिवस असल्याने वलप गावातील बाधितांना नेमका कोणता आजाराची लागण झाली याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांना करता आले नाही. पाण्याचे नमुने सोमवारी सकाळी अलिबाग येथील प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचे पनवेलचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इतकरे यांनी सांगितले होते. परंतु अलिबाग येथून अहवाल येण्यास उशीर होऊ नये यासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात या चाचण्या करण्यात आल्या. त्याच्या अहवालातून दोन दिवसांपासून डायरियाची साथ म्हणून जाहीर झालेल्या वलप गावात कॉलरा व गॅस्ट्रोची या साथ सुरू आहे हे निष्पन्न झाले. पनवेल तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी अनेक बैठका ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपर्यंत होताना दिसतात. परंतु या आपत्ती यंत्रणेच्या शिकवणीमध्ये वैद्यकीय आपत्तीचा उल्लेख नसल्याने वलप गावामधील बाधितांना वेळीच मदत मिळू शकली नाही. साथीने बाधित असलेल्या रुग्णांना नेमका कोणता आजार झालाय हे जाणून घेण्यासाठी दोन दिवस लागले. पनवेलसारख्या विकासनशील तालुक्यात येथील वैद्यकीय यंत्रणाच आजारी पडल्याचे चित्र वलप गावच्या साथीच्या आजाराने सिद्ध केले असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जात असून यंत्रणेच्या सेवेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उपचाराअभावी मुकेशचा मृत्यू
वलप गावाचा सहा वर्षीय मुकेश शर्मा या बालकाचा साथीच्या आजाराने उपचाराअभावी मृत्यू झाला. मुकेश वडील सावन शर्मा यांच्या आजारी दोन मुलींचा वैद्यकीय खर्च २४ हजार रुपयांपर्यंत झाला आहे. सरकारी यंत्रणेने साथ जाहीर केल्यानंतर रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा वेळीच राबविण्याची आणि रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यावर संबंधित खर्चाची तरतूद जिल्ह्य़ाची साथ नियंत्रण समिती करू शकते. या समितीचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असतात. त्यामुळे वलप गावच्या कॉलरा व गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या उपचारासाठी आणि खासगी रुग्णालयातील खर्चासाठी जिल्हाधिकारी पुढाकार घेतील का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे.