राज्य सरकारने गुटखाबंदी लागू करून दोन वर्ष उलटले, पण अजूनही प्रत्यक्षात तो बंद झालेला दिसत नाही. नुकत्याच झालेल्या दोन गुटखा जप्तीच्या मोठय़ा कारवायांवरून जिल्ह्य़ात मोठे गुटखा रॅकेट सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रॅकेटकडून संपूर्ण जिल्ह्य़ाला गुटख्याचा पुरवठा होत असल्याने सर्वत्र अगदी बिनदिक्कत कुठल्याही पानटपरीवर गुटखा मिळतो.
गुटखा खाणे शरीराला घातक आहे, हे माहीत असूनही दिवसेंदिवस गुटखा शौकीनांमध्ये वाढ होत आहे. अगदी शालेयवयीन मुलांमध्येही गुटख्याची लत पहायला मिळते. १०० मागे ७० जण गुटखा खाणारी आहेत. ही व्यसनाधिनता घातक असून राज्यात गुटखा बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी अनेक स्वयंसेवी संघटनांकडून होत होती. अखेर दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने गुटखाबंदीचा निर्णय घेतला, पण प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. गेल्या आठवडय़ात जळगाव जामोद पोलिस ठाण्याअंतर्गत सुनगाव फाटय़ानजीक मध्यप्रदेशातून येणारा ६ लाखाचा गुटखा पोलिसांनी पकडला.  अशाच स्वरूपाच्या काही छोटय़ा कारवाया जिल्ह्य़ात होतात, परंतु त्या अतिशय कमी प्रमाणात होत असून जिल्ह्य़ात दररोज मोठय़ा प्रमाणावर अशा छुप्या पध्दतीने गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचेही बोलल्या जात आहे.
याचाच परिणाम म्हणून आज बंदी असलेला गुटखा कुठेही जा अगदी सहज मिळतो. गुटखाबंदी झाली खरी, पण गुटखा उत्पादनावर मात्र कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी अजूनही गुटख्याचे उत्पादन होते, तर राज्यात परराज्यातून गुटखा पुरविला जात आहे. छुप्या मार्गाने गुटखा वाहतूक करून काळ्याबाजारात विकून मोठा नफा कमविणारे मोठे रॅकेट राज्यात सक्रीय आहे. त्यांच्याच माध्यमातून जिल्ह्य़ात गुटखा येतो. चार-दोन ठिकाणी दाखविण्यासाठी कारवाईचे नाटक होते, परंतु शासकीय अधिकाऱ्यांपासून साऱ्यांचेच यात हितसंबंध गुंतलेले आहेत. गुटखाबंदीमुळे किरकोळ विक्रेत्यांपासून डिलपर्यंत सर्वाचाच नफा वाढला आहे. कारण, काळ्याबाजारातून गुटखा मिळत असल्याने त्याचे भाव दुप्पट-तिप्पट झाले आहेत.
पोलीस पाटलासह तिघांविरुध्द गुन्हा
खामगाव तालुक्यातील अटाळी शिवारात २५ एप्रिलला अपघातग्रस्त झालेल्या बोलेरो गाडीत अवैध गुटखा आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पोलिस पाटलासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या बोलेरोत लाखो रुपयाचा गुटखा असल्याचे प्रत्यक्षदर्र्शीचे म्हणणे आहे, परंतु हे प्रकरण दडपले गेल्याने यातील सत्यता बाहेर येऊ शकली नाही. मेहकरहून खामगावकडे येत असलेली बोलेरो (क्र.एमएच २१ केएल २०७०) व खामगावकडून मेहकरकडे जात असलेल्या ४०७ मॅटेडोर (क्र.एमएच १६ क्यु.२७७८) मध्ये वळणरस्त्यावर समोरासमोर येऊन धडक झाली. यात अपघातग्रस्त बोलेरो गाडीत अवैध गुटख्याची वाहतूक होत होती. अपघातानंतर या गाडीच्या चालकाने पळ काढला. मात्र, अटाळी येथील पोलिस पाटलाने पोलिसांना सूचना न देता गाडीतील गुटखा लंपास केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चौकशी करून अटाळी येथील पोलिस पाटील शकील मुर्तुजा देशमुख व अनिकेत सुरेश वसतकार, सुर्यकांत साळवे या तिघांना अटक करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. तसेच टाटा ४०७ (क्र.एमएच २७ क्यु१६७८) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीच्या भाऊ व बहिणीच्या बोलेरो गाडी (क्र.एमएच २१ एन २२७०) ला धडक मारून चौघांना जखमी केले. सुनील अंबादास साळवे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.