ऐरोलीमध्ये एका चारवर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पुजाऱ्याला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी रबाले पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. सौरभ नरसिंह जोशी (२५) असे आरोपीचे नाव आहे.
ऐरोली सेक्टर ८ येथील एका सोसायटीमध्ये सोमवारी पूजा करण्यासाठी जोशी आला होता. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर एकटी खेळत असताना, जोशी याने तिला खाऊचे आमिष दाखवत जवळ बोलावले. यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे करीत होता. हा प्रकार पीडित मुलीच्या आईने पाहिला.
यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेजारी जमा झाले. त्यांनी जोशी याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रबाले पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली. मंगळवारी दुपारी त्याला वाशी न्यायालयात हजर करण्यात आले.