रस्ते, वीज व पाणी हे विकासाचे मुख्य केंद्रिबदू आहेत. तिरोडय़ातील अदानी वीज प्रकल्पातून विजेचे उत्पादन सुरू आहे. ही वीज महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध होणार आहे. हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत. रस्ते बांधकाम जोमाने सुरू आहे. एकंदर जिल्हा विकासाच्या वाटेवर वेगाने प्रगती करत आहे. यासाठी केंद्रातील अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षां पटेल यांनी केले.
सोनबिहारीच्या विष्णू मंदिर परिसरात आयोजित सिमेंट रस्ता भूमिपूजन व महिला बचत गटाच्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला विनोद हरिणखेडे, कुंदन कटारे, प्रिया हरिणखेडे, अखिलेश सेठ, बाळकृष्ण पटले, सनम कोल्हटकर, केवलराम रहांगडाले, डॉ. नितीन तुरकर, अंचलगिरी गोस्वामी, सतीश कोल्हे, येरूबाई माने, पेंढारीसाव डोहरे, इसूलाल कहनावत, नामदेव पंधरे आदी मान्यवर उपस्थित होते. वर्षां पटेल म्हणाल्या, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने जिल्ह्य़ातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आणणारे भिमलकसा, निम्न चुलबंद, धापेवाडा, बावनथडी, गोसेखुर्द, सोंडय़ाटोला सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आहे. या सिंचन प्रकल्पांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होणार आहे. आता खऱ्या अर्थाने जिल्ह्य़ाच्या विकासाला प्रारंभ झाला आहे. यासाठी पटेल यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न सुरू असून यापुढेही विकासाचा रथ गतीने पुढे जाण्यासाठी पटेलांच्या पाठीशी आपण सदैव असावे, तेही जिल्हावासीयांच्या पाठीशी राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.