भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी मुंबईतील इंदू मिलची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याचे समजताच सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील आंबेडकरी जनतेने जल्लोष केला. शहरात पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी फटाक्यांची मोठय़ा प्रमाणात आतषबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
उद्या, ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने समाजातील सर्वच घटकांनी समाधान व्यक्त केले. रामदास आठवलेप्रणीत रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येऊन जल्लोष केला. या वेळी फटाक्यांची तुफान आतषबाजी करण्यात आली.
बसपाचे प्रदेश सचिव राहुल सरवदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनीही मुंबईत इंदू मिलच्या जागेत महामानवाचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा अडथळा दूर झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. या पाश्र्वभूमीवर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या अधिपत्याखालील प्रबुद्ध भारत मंडळाच्या वतीने उद्या डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात तब्बल एक टन फुलांची आकर्षक सजावट केली जाणार आहे.
अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, अक्कलकोट, बार्शी, सांगोला आदी ठिकाणी आंबेडकरी जनतेने जल्लोष करून जणू दिवाळी साजरी केली. करमाळ्यात रिपाइंच्या नगरसेविका सुभाबाई कांबळे, सविता कांबळे, राजकुमार कांबळे, पप्पू ओहोळ, सम्राट अवचट, नितीन कांबळे आदींनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. या वेळी बुद्धवंदनाही सादर करण्यात आली.