बेवारस पार्सलमधील रेडिओचा वाहकाच्या घरी स्फोट झाल्यानंतर देश-राज्यातील गुप्तचर यंत्रणांनी तळ ठोकून तपास केला. मात्र, वैयक्तिक सुडाच्या भावनेतून केंद्रेवाडीतील मुंजाबा गिरी याने गावातीलच एकाला पोलिसांच्या कचाटय़ात अडकवण्यासाठी हा अघोरी प्रकार केल्याचे तपासात उघड झाले. दुसऱ्याला अडकवणाराच आता स्वत: अडकला. तब्बल ४ दिवस देशातील तपासी पोलीस यंत्रणांची झोप उडवणाऱ्या या स्फोटातील गुन्हेगार शोधून काढण्यास स्थानिक गुन्हा शाखेला यश आले.
काळेगावघाट (तालुका केज) येथे बेवारस पार्सलमधून आलेला रेडिओ सुरू करताच स्फोट झाला. स्फोटात वाहक ओम निंबाळकर याच्यासह चार जण जखमी झाले. थेट ग्रामीण भागात रेडिओतून स्फोट झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख, पोलीस विभागाचे प्रमुख यांच्यासह देशपातळीवरील तपास यंत्रणांचे अधिकारीही दाखल झाले. मुंबईहून बस आल्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड या शहरांसह या स्फोटामागे कोणती संघटना आहे, याचा शोध सुरू झाला. मात्र, स्फोट झाला त्या ठिकाणी सापडलेल्या अर्धवट जळालेल्या व तुकडे झालेल्या चिठ्ठीला जोडून पोलिसांनी केंद्रेवाडी हे नाव व एक मोबाइल नंबर मिळवला. या मोबाइल नंबरवरून केंद्रेवाडीतील गोपीनाथ तरकसे याला ताब्यात घेतले. मात्र, तरकसे याच्याकडून स्फोटाबाबत कुठलाच सुराग मिळेना. त्यामुळे त्याला गुंतवण्यासाठी कोणी हा प्रकार केला असेल का, यातून चौकशी करण्यात आली. त्या वेळी तरकसे याने गावातीलच आबा ऊर्फ मुंजाबा गिरी याच्याशी आपले भांडण झाले होते. त्याने या पूर्वीही आपणास एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगून त्याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी लागलीच गिरीच्या मुसक्या आवळल्या नि थोडय़ाच वेळात या घटनेची रहस्यमय कहाणी समोर आली.
वर्षभरापूर्वी गोपीनाथ तरकसे याने मुंजाबा गिरी याच्याविरुद्ध अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे गिरीने परस्पर तरकसेला अडकवण्याचा विचार केला. त्यातून मासे मारण्यासाठी डिटोनेटरचा वापर केला जातो. स्फोट कशा पद्धतीने केला जातो, याची प्राथमिक माहिती असल्याने दोन महिन्यांपूर्वीच गिरी याने रेडिओला डिटोनेटर लावले आणि २९ नोव्हेंबरला अंबाजोगाई येथून पार्सल कुर्ला गाडीमध्ये ठेवले. त्यात पोलिसांना तरकसेपर्यंत पोहोचता यावे, यासाठी एक पावती व त्यावर तरकसेचा मोबाइल क्रमांक टाकला. मात्र, हे पार्सल कोणीच न घेतल्यामुळे मुंबईहून परत आले नि वाहक निंबाळकरने घरी नेले व स्फोट झाला. गिरीला केवळ तरकसे यास पोलिसांच्या कचाटय़ात अडकवायचे होते, यासाठी त्याने हा उद्योग केला. मात्र, आता गिरी हाच यात पूर्णपणे अडकला आहे.    
जखमींवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया
रेडिओ स्फोट प्रकरणात गंभीर जखमी ओम निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा व आई यांच्यावर मुंबईत जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून स्फोटात चौघांच्याही डोळ्यांना मोठी जखम झाली आहे. यात निंबाळकर यांची पत्नी व दोन वर्षांचा मुलगा यांचे डोळे फुटले असून त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. जखमींच्या शरीरावर, प्रामुख्याने डोळ्यांवर जखमा झाल्या आहेत. निंबाळकर यांच्या डाव्या हाताचा अंगठा निकामी झाला. मुलगा कुणाल व पत्नी उषा यांच्या डोळ्यांत मातीचे कण गेल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जे.जे. रुग्णालयात प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर उपचार सुरू आहेत.