गोव्यात तयार केलेल्या बनावट विदेशी मद्याचा साठा सोलापूर जिल्ह्य़ात आणला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर पथकाने पाठलाग करून हा आठ लाख २० हजारांचा मद्यसाठा हस्तगत केला. मात्र मद्यसाठा आणणारे वाहन चालक व मालक दोघेही पळून जाण्यात यशस्वी ठरले. जिल्ह्य़ात अनगर (ता. मोहोळ) ते माढा रस्त्यावर रात्री ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापुरातील अधीक्षक संध्याराणी देशमुख व उपअधीक्षक एन. एस. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईची माहिती अशी, की अनगर-माढा रस्त्यावर उपळाई खुर्द (ता. माढा) पाटीजवळ गोव्यातून बनावट विदेशी मद्य तयार करून टेम्पोतून सोलापूरकडे आणले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपळाई खुर्द पाटीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. यात एमएच १७ टी-३८८८ हा टेम्पो अलगद सापडला. टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात विविध विदेशी बनावटीच्या मद्याचा साठा आढळून आला. मद्याच्या ६० खोकींसह टेम्पो जप्त करण्यात आला. परंतु या कारवाईत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत टेम्पोचालक व मालक दोघेही पळून जाण्यात यशस्वी ठरले. उत्पादन शुल्क निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक पी. यू. निकाळजे, एस. बी. साळुंखे, जवान मुकेश चव्हाण, संजय नवले, अण्णा केंचे, महिला जवान व्ही. डब्ल्यू थिटे यांनी या कारवाईत भाग घेतला होता.