या जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व संलग्न आरोग्यसेवेतील विशेषज्ञ, वरिष्ठ व क निष्ठ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची सुमारे शंभर पदे रिक्त असल्याने जिल्ह्य़ातील सार्वजनिक आरोग्य सेवा कमालीची कोलमडली आहे. आरोग्य सेवा संचालनालयाचा अदूरदर्शी व गलथान कारभार रुग्णांच्या जीवनाच्या मूळावर उठला आहे. असाच कारभार राहिल्यास कोटय़वधी रुपये खर्च करून व अतिमहागडी वैद्यक साधन सामुग्री असतांनाही अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी शासकीय रुग्णालये मृत्यूची आधार केंद्रे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्य़ात रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. जिल्ह्य़ात सक्षम व परिपूर्ण एकही शासकीय वा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना या सरकारी व्यवस्था व यंत्रणांवर संपूर्णपणे अवलंबून रहावे लागते. अशा परिस्थितीत जिल्ह्य़ातील बुलढाणा व खामगाव येथील सामान्य रुग्णालये, तालुक्याच्या ठिकाणची उपजिल्हा सामान्य रुग्णालये व ठिकठिकाणची ग्रामीण रुग्णालयांमध्ये वर्ग एक वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञांची तब्बल बत्तीस पदे व वर्ग दोनची चौतीस पदे रिक्त आहेत. याशिवाय, पॅरामेडिकल व आरोग्य कर्मचाऱ्यांची सुमारे चाळीस पदे रिक्त आहेत. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, वरिष्ठ फिजिशियन, अशा महत्वाच्या विशेषज्ञांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गर्भवती व बाळंतपणासाठी आलेल्या महिला, शल्यक्रियेची आवश्यकता असलेले रुग्ण, हदय, मधुमेह व टिबीचे रुग्ण, फ्रॅ क्चर झालेले रुग्णांचे फार हाल होतात. विशेषज्ञांच्या कमतरतेमुळे खामगाव व बुलढाणा रुग्णालयात अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना रेफर टू अकोला, औरंगाबाद अशी पर्यायी उपचार व्यवस्था सुचविली जाते. खामगाव-अकोल्याचे अंतर एक तासाचे व बुलढाणा-औरंगाबाद अंतर चार तासाचे असल्याने सुविधेअभावी गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावण्याची शक्यता असते.  जिल्हा रुग्णालयात ह्रदयविकार, सर्पदंश व विषबाधा झालेले रुग्ण, नवजात बालके, मुत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक निदान व उपचाराची साधने व उपकरणे आहेत, मात्र ती हाताळण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कुशल तंत्रज्ज्ञ व आरोग्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे या साधनांचा पूर्ण लाभ होत नाही. शासनाच्या आरोग्य खात्याकडून रुग्णनिदान व उपचार सुविधा, तसेच साधनांसाठी क ोटय़वधी रुपये उधळले जात असतांना वैद्यकीय तज्ज्ञ व कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वर्षांनुवष्रे भरली जात नाही. सार्वजनिक आरोग्य खात्यातील अनागोंदी कारभार, वैद्यकीय तज्ज्ञांना मिळणारे अपुरे वेतन व सुविधा, राजकीय दबाव, अतिरिक्त कामाचा बोजा व ताणतणाव, वाढत्या तक्रारी व हल्ले यामुळे अनेक डॉक्टर्स शासकीय आरोग्यसेवेत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहतात, याकडे आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री व संचालनालय गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.  रुग्णालयांच्या दुरावस्थेमुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व अत्यावश्यक राष्ट्रीय आरोग्य अभियानांनाही अपयशाचा सामना करावा लागत आहे.