लोकांमध्ये शिक्षणाची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी व राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा काय आहे, हे जनतेला माहिती होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे मुल्यमापन करण्याचे राज्य शासनाने निश्चित केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
अकोला पंचायत समितीच्या भूमिपूजन सोहळ्यास आले असता त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिदास भदे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा इंगळे, आमदार बळीराम शिरस्कार, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.    
राज्यात तीन वर्षांत टप्प्यात पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजना राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेची अंमलबजावणी अकोला जिल्ह्य़ात प्रभावीपणे झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शंभर गुणांची शैक्षणिक व तितक्याच गुणांची भौतिक सुविधांची तपासणी करण्यात येईल. या मोहिमेत शाळांचे मुल्यमापन करण्यात येईल. या पडताळणीत पालक व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी केले. बाळापूरच्या आमदारांनी स्थानिक पंचायत समिती महामार्गावर आणण्याची सुचना केली, तर जिल्हा परिषद अध्यक्षा इंगळे यांनी पंचायत समितीच्या नव्या इमारतीबद्दल समाधान व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे संचालन किशोर बळी यांनी, तर आभार पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यमंत्री सतेज पाटील व भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती राहणार होती, पण या दोघांच्या अनुपस्थितीमुळे येथे राजकीय चर्चेला उधाण आले होते. तसेच भारिपच्या एका आमदारांनी दारूच्या दुकानासाठी जाहिरपणे दिलेल्या शुभेच्छांची चर्चा या उद्घाटन स्थळी होती. युतीच्या नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळाली.