दिवसेंदिवस आक्रसत जाणारी दादर चौपाटी आणि त्यामुळे किनाऱ्याजवळील इमारतींना धडकणारा समुद्र हा चिंतेचा विषय ठरत असताना दादर चौपाटीच्या किनाऱ्यावरील वाळूची धूप रोखण्यासाठी आणि दादर ते माहीम हा १८०० मीटर लांबीचा किनारा वाचवण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या तिन्ही संस्था एकत्र येऊन प्रकल्प राबवण्याचा विचार करीत आहेत.
चैत्यभूमीपासून ते माहीमपर्यंत दादर चौपाटीच्या किनारपट्टीचा १८०० मीटरचा पट्टा दिवसेंदिवस कमी होत आहे. समुद्राच्या शिरकावामुळे लाटा थेट किनाऱ्यावरील इमारतींच्या भिंतींवर येऊन आदळत आहेत. परिणामी किनाऱ्यावरील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातले असून मेरिटाइम बोर्डामार्फत दादर चौपाटीच्या संवर्धनाचा आणि तेथील वाळूची धूप रोखून चौपाटी वाचवण्यासाठी प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे व तो सरकारकडे सादर झाला आहे.
त्यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि टेट्रापॉडचा वापर करून चौपाटीवर शिरणाऱ्या समुद्राच्या लाटांना रोखण्यात येईल. लाटा रोखल्या गेल्याने वाळूची धूप कमी होऊन किनाऱ्याचा पर्यायाने चौपाटी क्षेत्राचे रक्षण होईल. या प्रकल्पासाठी सरकार, महानगरपालिका आणि एमएमआरडीए या तिन्ही संस्थांनी मिळून खर्च करावा अशी योजना आहे. ही योजना मार्गी लागल्यास पुन्हा एकदा दादर चौपाटी ही लोकांना फिरण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. तसेच किनाऱ्यावरील इमारतींना असलेला समुद्राचा धोकाही नियंत्रणात येईल.