सध्याच्या व्यावसायिक शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणात सामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आधार बनलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) दर्जाहीन होत आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे रोजगारविषयक भवितव्य धोक्यात आले आहे. सोलापुरातील आयटीआयच्या वाटचालीवर विशेषत: परीक्षा निकालांवर प्रकाश टाकला असता ही दुरवस्था पाहावयास मिळते.
विजापूर रस्त्यावर विस्तीर्ण जागेत व सुसज्ज इमारतींमध्ये कार्यरत असलेल्या आयटीआयमध्ये मागील शैक्षणिक वर्षांतील २६ अभ्यासक्रमांपैकी चार अभ्यासक्रमांचा निकाल तर शून्य टक्क्य़ांपर्यंत खालावला आहे. तर नऊ अभ्यासक्रमांच्या निकालाचे प्रमाण जास्तीत जास्त २० टक्क्य़ांर्पयंत आणि एकूण २६ अभ्यासक्रमांच्या निकालाचे प्रमाण जेमतेम ३६.९७ टक्के एवढे खाली आले आहे. केवळ सरकारी लालफितीच्या कारभारामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ही घसरण चिंतनीय मानली जात आहे.
यासंदर्भात छावा मराठा विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दर्जा घसरू न देता तो कायम राहण्यासाठी व पर्यायाने गोरगरीब विद्यार्थ्यांचे रोजगार विषयक भवितव्य उज्ज्वल राहण्यासाठी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. याबाबतची भूमिका छावा मराठा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश ऊर्फ दत्ता पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
सोलापूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध २६ अभ्यासक्रम शिकणाऱ्या ८६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३१८ म्हणजे फक्त ३६.९७ टक्के विद्यार्थी यशस्वी होऊ शकले. यात सुतारकाम, यांत्रिक कषिर्ंत्र, पत्रे कारागीर, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स आदी अभ्यासक्रमांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर सीओई (३ टक्के), फौंड्रीमन (३.७०), नळ कारागीर (५.५), इंटिरियर डेकोरेटर (८.३३), संधाता (१०.४५), यांत्रिकी प्रशिक्षण व वातानुकूलन (११.७६), गवंडी (१३.३३), आरेखक स्थापत्य (१४.२८), यांत्रिकी डिझेल (१५.३८), याप्रमाणे निकृष्ट निकाल लागून शैक्षणिक प्रगती खालावली आहे. सर्वाधिक दिलासा देणारा निकाल (७७.२७ टक्के) कोपा अभ्यासक्रमाचा लागल्याचे दिसून येते. तर कातारी (७६.९२), इलेक्ट्रॉनिक्स (७२.२२), जोडारी (७०.५८), अॅडव्हान्स मोल्ड्स (६२.५), ओओएमटी (६१.५), यंत्रकारागीर (५८.३३) या अभ्यासक्रमांचा निकाल चांगला लागल्याने आयटीआयची बूज राखली गेली. एक वर्ष कालावधीच्या दहा अभ्यासक्रमांसाठी ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ६९ विद्यार्थी (२०.७२ टक्के) उत्तीर्ण होऊ शकले. तर तीन वर्षे कालावधीच्या विविध तीन अभ्यासक्रमांसाठी दिलेल्या परीक्षेत २०३ पैकी केवळ ३३.४९ टक्के म्हणजे ६८ विद्यार्थी यशस्वी झाले. दोन वर्षे कालावधीच्या विविध अभ्यासक्रमांचा निकाल ५५.८६ टक्के इतका समाधानकारक लागला. यात ३२४ विद्यार्थ्यांपैकी १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे दिसून येते.
संस्थेचा शैक्षणिक यशाचा आलेख खालावत चालल्याबाबत संस्थेच्या प्राचार्याकडे विचारणा केली असता त्यांनी विद्यार्थी व पालकांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीच जबाबदारीने शिकत नाहीत तर  आमचा काय दोष, असा सवाल प्राचार्य करतात, असे योगेश पवार यांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर छावा संघटना आंदोलन छेडणार असून संस्थेचा दर्जा कायम राखला गेला नाही तर विद्यार्थी व पालकांचा मोर्चा काढण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.