मार्केटमधील विविध सुविधांचा अभाव, रखडलेली कामे आणि चोरीचे वाढते प्रमाण अशा अनेक मांगण्यासंदर्भात आज ग्रोमा संघटनेच्या नेतृत्वाखाली मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा धडकला. या वेळी बाजार समिती सचिवांसमोर संतप्त व्यापाऱ्यांनी समस्यांचा पाढाच त्यांच्यापुढे वाचला. दरम्यान आक्रमक झालेल्या व्यापाऱ्याची आणि बाजार समितीचे सचिव सुधीर तुंगार यांच्या शाब्दिक चकमक उडाली. शुक्रवारी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  
बाजार समितीच्या मसाला व धान्य मार्केटमध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. भाजी मार्केटमध्ये प्रवेशद्वार व फळ मार्केटमध्ये विस्तारित मार्केटसह प्रवेशद्वारांचे काम सुरू आहे. सर्व कामे रखडल्यामुळे व्यापारी, माथाडी व वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त होत आहे. धान्य मार्केटमध्ये तर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सर्व ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे वर्षभरापासून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. मार्केटमध्ये वारंवार वाहतूककोंडीही निर्माण होत आहे.
बांधकामाचा कचराही मार्केटमध्येच टाकण्यात आलेला आहे. गटारांची अवस्थाही बिकट झाली असून पहिल्याच पावसात मार्केट परिसरात तळे साचल्याचे चित्र होते. त्याचप्रमाणे धान्य मार्केटमधील चढ-उतार करणाऱ्या धक्क्याची दुरवस्था झाली असून माथाडी कामगारांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. उंदीर व घुशी धान्याची नासाडी करत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मार्केटमधील सुरक्षा व्यवस्थेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार चोऱ्यांमुळे व्यापारी वर्ग त्रासला आहे. यासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून बाजार समितीशी पत्रव्यवहार करून अधिकारी दाद देत नसल्याने आज हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ग्रोमा संघटनेचे अध्यक्ष जयंतीभाई रांभिया, मानद सचिव पोपटलाल भंडारी, अशोक बढीया आदीसह व्यापारी वर्ग मोठय़ासंख्येने मोर्चात सहभागी झाला होता.