यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (इतिहास), ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर (विज्ञान) आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक) यांना देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी ही माहिती दिली.
येत्या दि.२४ ला सोनई येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. प्रत्येकी एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. प्रशांत गडाख यांनी सांगितले की, समाजसेवक, शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत अशा प्रतिभावानांच्या योगदानातून समाज प्रगतीची वाटचाल करतो. या प्रतिभावानांच्या ऋणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला. पहिल्याच वर्षी हिंदी-उर्दू साहित्यिक कवी गुलजार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि कोल्हापूर येथील हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड या संस्थेच्या प्रमुख डॉ. नसीमा हुरजूक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र घराघरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आदिवासींसाठी जीवन समर्पित केलेले आमटे दांपत्य आणि देशाच्या अणुऊर्जा निर्मितीत भरीव योगदान दिलेले शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी केले आहे.