विनाकारण अंगावर खेकसणारा, चिरीमिरीसाठी वाहनचालकांना नाडणारा, धनदांडग्यांना रेड कार्पेट टाकणारा आणि गरिबांना पोलीस ठाण्याच्या बाकडय़ावर तासन्तास बसवून ठेवणाऱ्या राज्यातील पोलिसांचे हे रूप आता बदलू लागले आहेत. रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांची पोलीस ठाण्यात कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना समुपदेशाच्या भूमिकेतून जनजागृतीचे धडे देणारी पाठशाळा दर शनिवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात सध्या भरत आहे.
नवी मुंबईत सध्या दोन हजार रिक्षा परमिट खुले करण्यात आले आहेत.  त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याबाहेर संध्याकाळी या रिक्षाचालक व पासपोर्टसाठी येणाऱ्या नागरिकांची ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी तोबा गर्दी होत असल्याचे दृश्य आहे.  नव्याने पदभार घेतलेले आयुक्त के. एल. प्रसाद यांनीही याविषयी सर्व पोलीस ठाण्यांना पत्र लिहून पोलिसांना नागरिकांचा मित्र होण्याचा सल्ला दिला आहे. कागदपत्राचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर चरित्र पडताळणी प्रमाणपत्रावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची सही क्रमप्राप्त असल्याने गोजरे या सर्व नागरिकांना दर शनिवारी एकाच वेळी आपल्या दालनात बोलावतात. त्यांच्या समोर त्यांची ही नवीन प्रबोधन शाळा सुरू होते. पाच-पन्नास नागरिकांच्या या समुहात गोजरेंचा पहिलाच प्रश्न असतो. हे प्रमाणपत्र घेताना तुम्हाला काय अनुभव आला? पोलिसांनी याबाबत तुम्हाला त्रास दिला का? यापूर्वीचा तुमचा अनुभव काय? पैसे वगैरे मागितले का? या प्रश्नांवर नागरिक संभ्रमात पडतात.  अजिबात घाबरू नका. तुम्ही काहीही बोललात तरी ती ऐकून घेण्याची मानसिकता आम्ही तयार केली आहे. असे यावेळी सांगण्यात येते.
तेव्हा मागे उभे राहिलेल्यापैकी एक रिक्षाचालक धीर एकटवून सांगतो. पोलीस ठाण्याच्या चकरा आणि शे-पाचशे रुपये दिल्याशिवाय प्रमाणपत्र हातात पडले नाही. वरिष्ठासमोर येण्याचा त्यामुळे प्रश्नच नाही. या वेळी कोणती कागदपत्रे हवीत याची एक छापील यादीच आमच्या हातात देण्यात आली होती. ती सर्व कागदपत्रे आणून दिल्यावर थेट आज तुमच्यासमोर उभे करण्यात आले. तुमच्या पोलिसांचे मिळालेले सहकार्य विश्वास बसणारे नाही असेही हा रिक्षाचालक सांगतो. पुरुषांनी महिलांसाठी किंवा महिलांनी स्वकमाईने दागदागिने केलेले असतात. ते सोनसाखळी चोरांच्या हातात सहज देण्यासाठी असतात का? तेव्हा सोने घालून मिरवण्याचा महिलांचा जन्मसिद्ध हक्क असला तरी ते कार्यक्रमांच्या ठिकाणीच घालावेत. त्यांचे प्रदर्शन टाळावे. रस्त्याने चालताना पदपथांचा वापर करावा. कष्टाने कमावलेल्या सोन्याची किंमत ठेवा. घरात दागिने ठेवू नका, ठेवलेत तर त्याची काळजी घ्या. अनोळखी माणसासाठी दरवाजा उघडताना खबरदारी घ्या. बसमधून प्रवास करताना शेजारच्या सहप्रवाशाचा संवाद किंवा वर्तन संशयास्पद वाटले तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. त्यामुळे तुम्ही चांगले नागरिक असल्याचे सिद्ध होते. सरतेशेवटी चरित्र पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला मिळत आहे, याचा अर्थ तुमचे चरित्र चांगले आहे असा होतो. हाच वसा आपल्या मुलांना द्या. असे शिक्षण दिल्यानंतर गोजरे सरांची शाळा समाप्त होते. त्यानंतर झटपट अर्जावर सह्य़ा झाल्याने तेथे आलेली मंडळी दालनाबाहेर पडतात त्या वेळी त्यांच्या मनात एक प्रश्न पिंगा घालत असतो. असेपण पोलीस असतात? यातील एकाने तरी आम्ही सांगितलेल्या सूचनांचे पालन केले तर हे प्रबोधन कामी आल्याचे समाधान गोजरे यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.