टिटवाळय़ात पालिकेच्या ‘बाग’ आरक्षणासाठी राखीव जागेवर भाजपचे स्थानिक नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी २०० अनधिकृत चाळी व बंगले बांधले आहेत. या प्रकरणाची जनता दरबारात तक्रार आल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी चौकशी करून आवश्यकतेनुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त, पालिका मुख्यालय उपायुक्तांना दिले आहेत. टिटवाळय़ातील या अनधिकृत बांधकामप्रकरणी स्थानिक भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईर यांनी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत; परंतु या तक्रारींची यामधील एकाही अधिकाऱ्याने दखल न घेतल्याने भोईर यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. डोंबिवलीत आयोजित पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात या अनधिकृत बांधकामांची तक्रार करण्यात आली आहे. नाईक यांच्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी पालिका उपायुक्त अनिल डोंगरे, प्रभाग अधिकारी गायकवाड यांनी टिटवाळय़ात जाऊन संबंधित अनधिकृत बांधकामांची पाहणी करून आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. ही बांधकामे करणारे नगरसेवक बुधाराम सरनोबत यांच्यावर एमआरटीपीची कारवाई करावी, त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, तक्रारदाराच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, अशा मागण्या ज्ञानेश्वर भोईर यांनी केल्या आहेत.