‘उद्योगरत्न’ रत्नाकर गुट्टे यांची अवस्था सध्या राष्ट्रवादीत जीव रमत नाही, अशी आहे. त्यामुळे  शिवसेनेमार्फत जर लोकसभेची उमेदवारी मिळाली, तरच पक्ष सोडण्याचा त्यांचा इरादा असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या आठवडय़ापासून गुट्टे हे शिवसेनेशी सलगी वाढवत असल्याची चर्चा जिल्ह्य़ाच्या राजकीय वर्तुळात आहे.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच श्री. गुट्टे यांना थेट राजकीय प्रवाहात आणले. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर हे निवडणूक हरल्यानंतर या मतदारसंघात धनशक्ती असणाऱ्या उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी पक्ष होता. त्यामुळेच गुट्टे यांना सुरुवातीला राष्ट्रवादीने मोठे स्थान दिले. पक्षातल्या कोणत्याही कार्यक्रमात बॅनरवर जिल्ह्य़ातील नेतेमंडळींच्या रांगेत गुट्टे यांचे छायाचित्र झळकत असे. पुढे श्री. वरपुडकर यांनी डॉ. मधुसूदन केंद्रे यांना राष्ट्रवादीत आणले. पालकमंत्री प्रकाश सोळंके यांची या पक्षप्रवेशात मोठी भूमिका होती. गंगाखेड येथे जाहीर कार्यक्रम घेऊन आणि मोठे शक्तिप्रदर्शन करत केंद्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. गुट्टे यांनी आपला साखर उद्योग सांभाळावा आणि केंद्रे यांना गंगाखेडच्या राजकारणात मदत करावी, असा जणू पक्षाने आदेशच काढला. त्यामुळे केंद्रे यांच्या प्रवेशानंतर गुट्टे यांना पक्षात मानाचे स्थान मिळेनासे झाले. कालांतराने डॉ. केंद्रे व गुट्टे यांच्यातच मोठी धुसफूस सुरू झाली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुट्टे यांनी उघडपणे आपली अस्वस्थता जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासमोर मांडली होती.
गंगाखेड विधानसभेसाठी तयारीला लागलेल्या गुट्टे यांना केंद्रे यांच्या आगमनानंतर पाणी सोडावे लागले. पुढे राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचा विचार लोकसभेसाठी होईल, अशी चर्चा सुरू झाली. गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेड येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यमंत्री फौजिया खान यांनी गुट्टे यांनी ‘आता लोकसभेची तयारी करावी’, असे सांगून या चर्चेला जाहीर व्यासपीठावर आणले. गेल्या एक महिन्यापासून राष्ट्रवादीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या मतभेदाच्या पाश्र्वभूमीवर गुट्टे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. जर राष्ट्रवादीत लोकसभेवरून चालू असलेला कलगीतुरा थांबला असता, तर कदाचित गुट्टे यांच्या शिवसेनेशी सलगी वाढण्याच्या प्रकारालाही पूर्णविराम मिळाला असता. सुरुवातीला लोकसभेचे उमेदवार म्हणून विजय भांबळे यांचे जिल्हास्तरावर दौरे सुरू असताना माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी भांबळे यांना शह देण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू केल्या. आता राज्यमंत्री फौजिया खान यांच्याही नावाची लोकसभेसाठी चर्चा आहे. जी नावे चर्चेत आहेत, त्यात आपण कुठेच नाही, असा विचार गुट्टे यांनी केला असावा. शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखांशी गुट्टे यांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सेनेशी सलगी वाढत असल्याच्या बातमीला जणू भक्कम आधारच मिळाला.
दरम्यान गुट्टे जर शिवसेनेच्या वर्तुळात जात असतील, तर त्यांना लोकसभा हवी की विधानसभा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खुद्द गुट्टे यांना मात्र लोकसभा निवडणुकीत रस आहे. गुट्टे यांना शिवसेनेत पाठविण्यामागे खुद्द गोपीनाथ मुंडे यांचाही कानमंत्र असल्याची  चर्चा आहे. गुट्टे जर शिवसेनेच्या वतीने गंगाखेडचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविणार असतील, तर भारतीय जनता पक्ष या जागेवरील आपला दावा सोडून देईल, असाही मतप्रवाह व्यक्त  होत आहे. प्रत्यक्षात हाती काहीच न येता गुट्टे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील याची शक्यता कमीच आहे.
 जर शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी देण्याबाबतचा खात्रीशीर शब्द दिला, तर मात्र ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील. उद्योजक म्हणून असलेली ओळख सध्या त्यांना अपुरी वाटत असून राजकीय महत्त्वाकांक्षा स्वस्थपणे बसू देत नाही. ही त्यांची खरी अडचण आहे. जर शिवसेनेने उमेदवारीचे आश्वासन दिले नाही, तर गुट्टे यांची शिवसेनेशी असलेली सलगी ही निव्वळ ‘वाऱ्याची वरात’ ठरू शकते.
शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने गुट्टे यांना लोकसभेसाठी उमेदवार म्हणून निश्चित केले, तर मात्र ते राष्ट्रवादीतून बाहेर पडू शकतात. किंबहुना आपण शिवसेनेच्या संपर्कात आहोत, असे दाखवून गुट्टे यांनी राष्ट्रवादीकडून गंगाखेडची उमेदवारी तरी मिळवावी, यासाठीही ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.