पर्यटनाच्या राजधानीत २० दिवस चालणाऱ्या ‘कलाग्राम दिवाळी’ या कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. ८) सुरू होणाऱ्या महोत्सवात देशभरातील हस्तशिल्पं, कलावस्तू, खाद्यपदार्थ व मनोरंजनपर कार्यक्रमांची लयलूट असेल.
पर्यटन विकास महामंडळाने महोत्सवाचे आयोजन केले आहे.
२७ नोव्हेंबपर्यंत सिडको येथील कलाग्राम परिसरात चालणाऱ्या या महोत्सवात देशातील जवळपास ८० कारागीर आपल्या हस्तकला विक्रीस आणणार आहेत.
पैठणी साडय़ा, घोंगडी, लखनौचे दिवाळी दिवे, हिमरू शाली, बिदरी, कॅलोग्राफी, कार्ड, अजिंठा पेंटिंग, हेराकोटा, वारली पेंटिंग, लाकडापासून तयार केलेली विविध शिल्पे, साडी पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, ग्लास आर्ट, डायमंड आर्टस्, राजस्थानी कला, वनौषधी, पंचधातू हस्तशिल्प, कागदापासून चिमण्या बनविण्याची कला, अजमेर बांगडय़ा, हैदराबादी बांगडय़ा, कुशन्स, आकाशदिवे, सावंतवाडी लाकडी खेळणी, नऊवार साडय़ा, मेटलक्राफ्ट, तांब्याचे दिवे आदी हस्तकलांचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक व विक्री या वेळी होईल.
देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांकडून अजिंठा पेंटिंग आणि वारली पेंटिंग शिकण्याची दुर्मिळ संधी जिज्ञासूंना मिळणार आहे. त्याशिवाय हर्सूल कारागृहातील बंद्यांनी तयार केलेले फर्निचर, कापड अनेक वर्षांनंतर प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.
जुन्या औरंगाबादचे वैशिष्टय़, काळाच्या ओघात नाहीशा झालेल्या टांग्यातून लहान मुलांना सवारी, तसेच घोडेस्वारी शिकण्याची संधीही महोत्सवात मिळणार आहे.
गुरुवारी (दि. ८) दुपारी ४ वाजता ज्येष्ठ संग्राहक डॉ. शांतिलाल पुरवार यांच्या हस्ते ‘कलाग्राम दिवाळीचे’ उद्घाटन होणार आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक अजय अंबेकर या वेळी उपस्थित राहील. या वेळी दिलीप खंडेराय व त्यांचे सहकारी लोकनृत्याचा कार्यक्रम सादर करतील. दिवाळी महोत्सवात सर्व स्टॉल दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत खुले असतील. या २० दिवसांत एकूण ८ सांस्कृतिक कार्यक्रम कलाग्रामच्या हिरवळीवर सादर होतील. सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वाना मोफत प्रवेश आहे.
दिव्यांचे अनोखे प्रदर्शन
भारतीय संस्कृतीत अढळ स्थान असलेल्या विविध प्रकारच्या दिव्यांचे प्रदर्शन हे कलाग्राम दिवाळीचे प्रमुख आकर्षण असेल. प्राचीन, अर्वाचीन काळातील, विविध प्रदेशातील दिव्यांचा संग्रह डॉ. पुरवार यांच्याकडे आहे. त्यांनी जमा केलेल्या १७ हजार अनेक दुर्मिळ कला वस्तूंपैकी सुमारे १५० दिवे कलाग्रामच्या दालनात पाहता येतील. पाषाण युगातील तसेच माती, दगड व विविध धातूंचे, विविध इंधन वापराचे शेकडो आकार, प्रकारातले दिवे एका छताखाली पाहावयास मिळतील.