संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात गाजलेल्या माढा तालुक्यातील हणमंत आतकर खून खटल्यातील प्रमुख सूत्रधार गणेश घुगे याच्यासह सर्व पाच आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी दुपारी उशिरा जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख आरोपी गणेश घुगे यास फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. परंतु पूर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारलेल्या या खटल्यात नंतर झालेल्या युक्तिवादात विशेष सरकारी वकिलांनीच फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. त्यानुसार निकाल सुनावण्यात आला.
गणेश हणमंतर घुगे (वय ३०), अमोल अरुण उकरंडे (वय २८), जितेंद्र मोहन वाल्मिकी (वय २८), रवी ऊर्फ लाल्या सुरेश लेंगरे (वय २७, चौघे रा. कुर्डूवाडी, ता.माढा) व दादा ऊर्फ प्रवीण सतीश पवार (वय ३०, रा. मांजरी, हडपसर, पुणे) अशी जन्मठेप व दंडाची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी या खटल्याचा ९८ पानी निकाल मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जाहीर केला. आरोपींकडून दंडाची रक्कम वसूल झाल्यास त्यापैकी २५ हजारांची रक्कम नुकसानभरपाईपोटी मृत हणमंत आतकर यांच्या विधवा पत्नी चंदाराणी आतकर यांना द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व आरोपी शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची कोणतीही भावना दिसून आली नाही, तर मूळ फिर्यादी चंदाराणी आतकर यांनी या न्यायालयीन निकालाचे स्वागत करताना आपणास न्यायदेवतेकडून न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष सरकारी वकील मिलिंद थोबडे यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
मागील चार वर्षांपासून हणमंत आतकर खून खटला सोलापूरच्या सत्र न्यायालयात प्रलंबित होता. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. वडाळी यांच्यासमोर झाली. नंतर ती दुसरे सत्र न्यायाधीश ए. आर. तिवारी यांच्यापुढे झाली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होऊन त्यात निकाल लागला. या खटल्यात विशेष सरकारी वकील मिलिंद थोबडे यांना सहायक म्हणून अ‍ॅड. राजकुमार म्हात्रे व अ‍ॅड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांच्यासह अ‍ॅड. जगदीश परदेशी, अ‍ॅड. रझाक शेख, अ‍ॅड. व्ही. डी. फताटे, अ‍ॅड. विद्यावंत पांढरे यांनी बाजू मांडली.
माढा तालुक्यातील बारलोणी येथे हणमंत आतकर गुरुजी यांनी महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची उभारणी करून सहकार क्षेत्रात भरीव कार्य हाती घेतले होते. पतसंस्थेपाठोपाठ त्यांनी कुर्डूवाडी परिसरात दूध शीतगृह प्रकल्पासह खासगी साखर कारखाना प्रकल्प उभारण्याचा संकल्प हाती घेतला होता. परंतु यातून होत उत्कर्ष सहन न झाल्याने त्यांच्यावर काही विघ्नसंतोषी मंडळी चिडून होती.
यातच २५ जून २००८ रोजी आतकर गुरुजींचे अपहरण करून त्यांच्याकडून दहा लाखांची खंडणी वसूल करून नंतर त्यांचा अमानुष पध्दतीने खून करण्यात आला. नंतर त्यांचा मृतदेह वालचंदनगरजवळील मदनवाडीच्या पुलाखाली फेकून देण्यात आला. आतकर यांच्याकडून दहा लाखांची खंडणी त्यांच्याच पतसंस्थेतून उकळण्यात आली होती. या संपूर्ण गुन्ह्य़ात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. मृत आतकर गुरुजींशी आरोपींचा मोबाइलद्वारे झालेला संपर्क, आतकर यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्याच सांगण्यावरून आरोपी दादा पवार याने म.फुले पतसंस्थेत येऊन घेतलेली दहा लाखांची रक्कम व त्यावेळी पतसंस्थेचे सचिव सोमनाथ आतकर यांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यावरून दादा पवार याचे टिपलेले छायाचित्र व केलेले छायाचित्रण महत्त्वाचे ठरले. आरोपींचे एकमेकांशी सतत झालेला मोबाइलवरून संपर्क आदी पुरावे महत्त्वाचे ठरले.
या खटल्यात पोलीस तपास समाधानकारक नव्हता. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्याबद्दल न्यायालयानेच शेरा मारला. आरोपी दादा ऊर्फ प्रवीण पवार याची माढा तहसीलदारांकडून घेण्यात आलेल्या ओळखपरेडमध्येही बऱ्याच विसंगती होत्या. त्याचा फायदा आरोपींना मिळू शकत होता. इतर अनेक पंचही फितूर झाले होते. परंतु विशेष सरकारी वकील थोबडे यांनी या विसंगतीचा परिणाम खटल्यावर होणार नाही या दृष्टीने काही न्यायालयीन निवाडे सादर केले. मृत हणमंत आतकर गुरुजींनी पाठविले म्हणून आरोपी दादा पवार याने म. फुले पतसंस्थेत येऊन दहा लाखांची खंडणी घेतली. नंतर आतकर गुरुजींचा शोध लागला नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण सांगण्याची जबाबदारी आरोपींवरच होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. थोबडे यांनी केला असता तो न्यायालयाने ग्राह्य़ धरला.
या खटल्यातील आणखी एक आरोपी हणमंत ऊर्फ हणम्या कळसाईत हा अद्याप फरारी असून त्याचा शोध लागल्यानंतर त्याच्याविरुध्द न्यायालयात स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविला जाणार आहे.
मृत आतकर यांच्या पत्नी चंदाराणी आतकर यांनी या खटल्याच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र आतकर गुरुजींच्या हत्येचे मूळ शोधले गेले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर एकाही आरोपीच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव उमटत नाहीत. सर्व आरोपी शांत राहतात. याचा अर्थ त्यांच्यामागे एखादी शक्ती कार्यरत असली पाहिजे.
फरारी आरोपी हणम्या कळसाईत याचा ठावठिकाणा लागल्यानंतर या खटल्याचे खरोखर सूत्रधार कोण आहेत, यावर प्रकाश पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी कोणतेही पाठबळ नसताना आपण केलेले चिकाटीचे प्रयत्न सफल झाले. आपल्यावर दबाव येत होता. विशेष सरकारी वकील मिळू न देण्याचा प्रयत्न झाला. परंतु अखेर सत्याच्या बाजूने न्याय मिळाला, अशी भावना चंदाराणी आतकर यांनी व्यक्त केली.    
फाशीऐवजी जन्मठेपेची मागणी
हणमंत आतकर खूनखटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी काल सोमवारी प्रमुख आरोपी गणेश घुगे यास फाशीची शिक्षा का सुनावली जाऊ नये अशी विचारणा केली होती व त्यावर आज मंगळवारी सुनावणी निश्चित केली होती. सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फाशीच्या शिक्षेबाबत कायद्यातील तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या व त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडेही सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिवाडय़ानुसार दुर्मिळात दुर्मिळ गुन्हय़ामध्ये अपवादात्मक दृष्टीने फाशीची शिक्षा देण्यात यावी असे आदेश दिल्याचे अ‍ॅड. थोबडे यांनी निदर्शनास आणून दिले. सदरचा खटला हा दुर्मिळातील दुर्मिळ या व्याख्येत येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु आरोपींनी सदर खटल्याच्या अनुषंगाने केलेला गुन्हा हादेखील गंभीर असल्याचे सांगून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. विशेष सरकारी वकील थोबडे यांच्या निष्पक्षपातीपणाबाबत न्यायालयाच्या आवारात त्यांचे कौतुक करण्यात आले.