परीक्षेतील गुण वाढविण्यासाठी हवे असणारे २० हजार रूपये मिळविण्यासाठी मित्राच्या आईची हत्या करणाऱ्या तिघा तरुणांना जेरबंद करण्यात अंबरनाथ येथील पोलिसांना यश आले आहे. शहरातील वडवली विभागात १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला होता. या तीन आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर अन्य दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तिघेही आरोपी सधन कुटुंबातील आहेत. त्यापैकी वीरेंद्र नायडू (२२) साऊथ इंडियन महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षांला होता. कुणाल सिंग (२२) मुंबई विद्यापीठातून एमकॉमचे शिक्षण घेत होता. तिसरा १७ वर्षीय विशाल भोसले भिवपुरी येथील तासगांवकर महाविद्यालयात शिकत होता. आदित्य उरमोटकर हा त्यांचा मित्र होता. ‘त्या दिवशी संध्याकाळी  स्नेहल घरात एकटय़ाच असल्याची खात्री करून आदित्यचा नंबर हवा असल्याचा बहाणा करून हे तिघे घरात घुसले.  त्यांनी स्नेहल यांच्या तोंडावर क्लोरोफॉर्मचा रूमाल कोंबून त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्नेहल यांनी त्यास प्रतिकार केला, तेव्हा आपल्याजवळील कटरने त्यांनी त्यांच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर २० हजारांचा मुद्देमाल घेऊन हे तिघे फरार झाले. याप्रकरणी कुठल्या महाविद्यालयातून गुण वाढवून देण्यासाठी पैशाची मागणी होत होती, याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.