कोराडी येथील महानिर्मितीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी सामाजिक उपक्रमांतर्गत रुग्णालय बांधले. परंतु येथे आरोग्याच्या योग्य सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. त्यामुळे हे रुग्णालय सध्या शोभेची वास्तू बनली आहे.
तीन वर्षां पूर्वी महानिर्मिती कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कर्मचारी वसाहत परिसरात २० खाटांचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वसाहतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची एक इमारत महानिर्मितीला देण्यात आली. महानिर्मितीने येथे ९५ लाख ३१ हजार रुपये खर्च करून या इमारतीचा कायापालट करून रुग्णालय बांधले. सुरुवातीला या रुग्णालयाचे उद्घाटन कुणी करावे, यावरून मतभेद झालेत. त्यामुळे बरेच दिवस ही इमारत तशीच पडून होती. शेवटी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीचे उद्घाटन केले. प्रकल्पग्रस्तांना आरोग्य सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महानिर्मितीने ऑरेंज सिटी हॉस्पिटलसोबत करार केला. त्यानुसार येथे बाह्य़ रुग्ण विभाग सुरू करण्यात आला. करारानुसार ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील डॉ. अग्रवाल दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे उपलब्ध असतात. यावेळेत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला देतात. करारानुसार येथे येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांकडून तपासणीचे कुठलेही शुल्क घेतले जात नाही. परंतु त्यांना लागणारी औषधे बाहेरूनच आणाव्या लागतात. त्यामुळे दररोज येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प म्हणजे पाच ते सातच असते, असे सूत्रांनी सांगितले.
याशिवाय खसाळा, मसाळा, सुरेवानी, लोणखैरी या गावातील प्रकल्पग्रस्तांना हे रुग्णालय फारच दूर पडते. तसेही तपासणीशिवाय काहीही सवलत नसल्याने या गावातील प्रकल्पग्रस्त जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतात. येथे फक्त महादुला, कोराडी, भोकारा या गावातीलच रुग्ण येतात. गंभीर रुग्णांना येथे दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, हा रुग्णालय बांधण्यामागचा हेतू होता. परंतु त्यादृष्टीने महानिर्मितीने प्रयत्नच केले नाहीत. केवळ प्रकल्पग्रस्तांना भूलथापा देण्यात आल्या. २० खाटा असणाऱ्या रुग्णालयासाठी आवश्यक तेवढे डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक होते. तसेच आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे आवश्यक होते. असे काहीही केले नाही. रुग्णालय नावाची एक इमारत तेवढी उभी केली. ऑरेंज सिटी हॉस्पिटलसोबत करार केला परंतु तो बाह्य़रुग्ण विभागापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे या रुग्णालयात कोणत्याही आरोग्य सोयी उपलब्ध नसल्याने येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उपचार करून घेण्यासाठी येत नाहीत. याशिवाय दोन हजार प्रकल्पग्रस्त असताना त्यांचे आरोग्य कार्ड तयार करण्यात आले नाहीत. आतापर्यंत फार कमी म्हणजे तीनशेच प्रकल्पग्रस्तांचे आरोग्य कार्ड तयार करण्यात आले.
यासंदर्भात ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महावितरणसोबत जो करार झाला, त्यानुसार येथे आरोग्य सेवा दिली जात आहे. रुग्णालयात रुग्ण न येणे ही आमच्या क्षेत्रातील बाब नाही. रुग्णांचा प्रतिसाद मिळत नाही, ही खरी बाब आहे. अकरा महिन्याचा करार असून चार महिने झाले आहे. हा करार संपल्यानंतर पुन्हा करार करावा किंवा नाही, ते ठरवू. या भागातील आमदार चंद्रशेखर बावनकुळे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, वीज निर्मिती केंद्र व इतर कामासाठी ज्यांनी आपली शेती दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या आरोग्याशी महानिर्मिती खेळ करत आहे. महानिर्मितीने सामाजिक दायित्वातून ५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे करणे तसेच येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु बाह्य़रुग्ण विभाग सुरू करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महानिर्मितीने कंत्राटी कर्मचारी, प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या कुटुंबीयांना आरोग्य कार्ड दिले पाहिजे. परंतु तसे करण्यात आले नाही. प्रकल्पग्रस्तांना येथे योग्य उपचार मिळत नसल्याने अन्य खासगी रुग्णालयात अथवा नागपूरला धाव घ्यावी लागते. त्यामुळे हे रुग्णालय कुचकामी ठरले आहे. किमान महानिर्मितीने आता तरी पुनर्विचार करावा, असेही बावनकुळे म्हणाले.
कोराडी वीज औष्णिक केंद्राचे उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी संजय अस्वले म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना आरोग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महानिर्मितीतर्फे बाह्य़रुग्ण विभाग उघडण्यात आला. येथे येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची तपासणी करून योग्य तो सल्ला दिला जातो. या प्रकल्पग्रस्तांचे आरोग्य कार्ड तयार करण्यात येत आहे. या सोयीचा प्रकल्पग्रस्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महानिर्मितीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गंभीर प्रकल्पग्रस्तांना उपचार का दिले जात नाहीत, याचे उत्तर देण्यास नकार देऊन हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील असल्याचे त्यांनी सांगितले.