एकीकडे मुंबई ठप्प झालेली असतानाच दुसरीकडे मात्र ‘लाँग वीकेण्ड’ मिळाल्याने काही मुंबईकर खुशीत होते. शुक्रवारी सकाळीच तिन्ही रेल्वे मार्ग बंद पडल्याने आणि शाळा, सरकारी कार्यालये बंद असल्याची माहिती मिळाल्याने वीकेण्डला लागून आलेल्या शुक्रवारच्या सुट्टीचा काहीजणांनी पुरेपूर आनंद घेतला. अवचित मिळालेल्या सुट्टीमुळे बच्चेकंपनीसोबत आई-बाबाही खूश होते. सकाळी सकाळी महाविद्यालयात उत्साहाने गेलेल्या तरुणांनी घरी परतण्याऐवजी पावसात मनसोक्त भिजत मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे दुपारी ऐन भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरील लाटांमध्ये भिजण्यासाठी आलेल्या उत्साही वीरांना मागे हटवण्यासाटी पोलीस तैनात करण्याची गरज भासली.

गेल्या आठवडय़ापर्यंत अनियमित असलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासून धरलेला जोर शुक्रवारी मध्यरात्री आणि पहाटेही कायम राहिल्याने शुक्रवारी सकाळपासून मुंबईची जीवनवाहिनी ठप्प होती. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गावर पाणी साचल्याने सकाळपासून कुर्ला आणि वांद्रे या स्थानकांपुढे गाडय़ा येणे शक्य नव्हते. परिणामी, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि चर्चगेट ते अंधेरी यादरम्यान वाहतूक बंद होती. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसला. शुक्रवारी अचानक रेल्वेमुळे मिळालेल्या सुटीने मुंबईकरांचा वीकेंड तीन दिवसांचा बनला.
गुरुवारी संध्याकाळपासूनच संततधार सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून चांगलाच जोर लावला होता. शुक्रवारी पहाटेही पावसाने थांबण्याचे नाव घेतले नाही. त्यामुळे सकाळपासूनच माटुंगा, माटुंगा रोड, कुर्ला, शीव, माहीम, करीरोड आदी भागांत रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पहाटे लवकर सुटलेल्या गाडय़ाही कूर्मगतीने पुढे सरकत होत्या. सकाळी सातच्या सुमारास चर्चगेट ते बोरिवली आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला यांदरम्यान मुख्य आणि हार्बर मार्गावरही वाहतूक होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्याआधीच बाहेर पडलेल्या मुंबईकरांना मात्र बराच वेळ प्लॅटफॉर्मवर थांबावे लागले. ज्या प्रवाशांना गाडी मिळाली त्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. अनेक गाडय़ा कुर्ला किंवा अंधेरी स्थानकात रद्द करण्यात येत होत्या. अखेर मुंबईकरांनीही सक्तीची सुटी घेणेच पसंत केले. दुपारी पाऊस जरा ओसरल्यावर मध्य रेल्वे मार्गावर सर्वप्रथम आठ किमी प्रतितास या वेगमर्यादेने लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्यात आल्या. मात्र बराच काळ लोकल सेवा खंडित होती. दरम्यान, बाहेरगावाहून येणाऱ्या गाडय़ाही मध्येच रद्द करण्यात आल्या. पुण्याहून सकाळी येणाऱ्या बहुतांश गाडय़ा लोणावळा, कर्जत, पिंपरी येथेच थांबविण्यात आल्या. तर नाशिकहून येणारी पंचवटी एक्स्प्रेसही कसारा स्थानकातच रद्द केली. पश्चिम रेल्वेवरही माहीम, माटुंगा रोड येथे प्रचंड पाणी तुंबले होते. दादरच्या पुढे चर्चगेटच्या दिशेनेही पाणी रेल्वे रुळांवर साचल्याने पश्चिम रेल्वे खंडित झाली होती. त्यातच सांताक्रूझ येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने समस्येत भरच पडली. परिणामी, पश्चिम रेल्वेवरील सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. विरार ते अंधेरी या मार्गावर मात्र सेवा सुरू होत्या. दरम्यान, बेस्टचे अनेक चालक आणि वाहक तसेच तांत्रिक कर्मचारी रेल्वे बंद असल्याने कामावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे बससेवाही विस्कळीत झाली होती. त्यातच अनेक सखल भागांत पाणी भरल्याने बेस्टचे अनेक मार्ग वळवण्यात आले. मात्र चालक-वाहक यांनी जवळच्या आगारांत जाऊन आपला कार्यभार स्वीकारावा, असे आदेश बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिले. तसेच रेल्वे बंद असल्याने लांब पल्ल्याच्या सेवा बेस्टने चालवाव्यात, असा निर्णयही बेस्टने घेतला. त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई शहर, ठाणे ते मुंबई शहर, पश्चिम उपनगरांपासून दक्षिण मुंबईत येणारी सेवा, अशा सेवा सुरू ठेवण्यात आल्या.

मध्य रेल्वेने रद्द केलेल्या गाडय़ा
* मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस – कसारा स्थानकात रद्द
* मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – नाशिक रोड स्थानकात रद्द
* पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस – पनवेल स्थानकात रद्द
* पुणे-मुंबई डेक्कन क्वीन – लोणावळा स्थानकात रद्द
* नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस – इगतपुरी स्थानकात रद्द
* पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस – कल्याण स्थानकात रद्द
* कोल्हापूर-मुंबई सह्य़ाद्री एक्स्प्रेस – चिंचवड स्थानकात रद्द
* मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
* पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
* मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
* पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस