हस्ताच्या पहिल्याच पावसाने नगर शहर व परिसराला झोडपून काढले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहराच्या सखल भागात चांगलेच पाणी साचले. या मुसळधार पावसाने वीजपुरवठय़ाचीही पुरती वाट लावली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरासह जिल्ह्य़ात सर्वत्र कमी-अधिक पाऊस झाला. उत्सवाच्या आदल्या दिवशी पावसाचे पुनरागमन झाले, त्याने श्रींच्या विसर्जनाच्या पुढच्या दिवसापर्यंत मुक्काम ठोकला होता. पंधरा दिवसांपूर्वी मात्र त्याने विश्रांती घेतली. दरम्यानच्या काळात गेल्या दि. २७ ला पावसाचे हस्त नक्षत्र सुरू झाले, त्यानंतर आज पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले.
आज दुपारी २ च्या सुमारास शहर व परिसरात मुसळधार स्वरूपातच हस्ताच्या पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह सुमारे दीड तास हा पाऊस सुरू होता. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच शहरातील रस्त्यांना ओढय़ाचे स्वरूप आले. सखल भागातही लगेचच पाणी साचले. अनपेक्षितपणे आलेल्या या पावसाने नगरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार सरी ओसरल्यानंतरही बराच वेळ भुरभुर सुरू होती. या पावसाने हवेतही गारवा निर्माण झाला. गेले तीन, चार दिवस हवेतील उष्णता चांगलीच वाढली होती, मात्र पावसाची अन्य चिन्हे नव्हती. पाऊस झाल्यानंतर काही वेळातच शहरातील मोठय़ा भागाचा वीजपुरवठा खंडित झाला, तो बराच काळ तसाच होता. दुपारी ४ च्या दरम्यान वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला, मात्र सततच्या व्यत्ययानंतर सायंकाळी ५ ला पुन्हा खंडित झालेला वीजपुरवठा दोन तासांनी सुरळीत झाला.
गणेशोत्सवाच्या काळात दररोज झालेल्या पावसाने जिल्ह्य़ाची वार्षिक सरासरी ओलांडली असून तोपर्यंत जिल्ह्य़ात १०२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात अजूनही मोठय़ा पावसाची नितांत आवशकता आहे. श्रीगोंदे व एक, दोन तालुक्यांचा अपवाद वगळता जिल्ह्य़ात अजूनही ओढे-नाले वाहिलेच नाही. त्यामुळे विहिरींनाही अद्यापी पाणी आलेले नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच शनिवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवातही मोठय़ा पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रात्रीही मुसळधार!
दुपारी चारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने शहर व परिसरात रात्री आठच्या सुमारास पुन्हा जोरदार हजेरी लावली. मुसळधार स्वरूपातच सुरू झालेल्या पावसाने पुन्हा शहराला झोडपून काढले. सातत्याने जोरदार सरी कोसळत होत्या. सुरुवातीला मेघगर्जना झाल्या, त्यानंतर काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारचा पाऊस थांबल्यानंतरही सायंकाळी पुन्हा हवेतील उष्णता वाढली होती, अपेक्षेप्रमाणे रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Oct 2013 रोजी प्रकाशित
हस्ताच्या पहिल्याच पावसाने नगरला झोडपले
हस्ताच्या पहिल्याच पावसाने नगर शहर व परिसराला झोडपून काढले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहराच्या सखल भागात चांगलेच पाणी साचले. या मुसळधार पावसाने वीजपुरवठय़ाचीही पुरती वाट लावली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 04-10-2013 at 02:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in nagar