बुलढाण्यात गावरान आंब्यांची चलती

कोकणातील महागडय़ा हापूस, पायरी, दशेरी या आंब्याच्या विक्रीचा जिल्ह्य़ात बोलबाला असतांना गावरान आंब्याचे उत्पादनही बऱ्यापैकी झाल्याने खेडय़ापाडय़ातील हा आंबा जिल्हा व तालुक्याच्या बाजारपेठांमध्ये मोटय़ा प्रमाणावर विक्रीला येऊ लागला आहे.

कोकणातील महागडय़ा हापूस, पायरी, दशेरी या आंब्याच्या विक्रीचा जिल्ह्य़ात बोलबाला असतांना गावरान आंब्याचे उत्पादनही बऱ्यापैकी झाल्याने खेडय़ापाडय़ातील हा आंबा जिल्हा व तालुक्याच्या बाजारपेठांमध्ये मोटय़ा प्रमाणावर विक्रीला येऊ लागला आहे. हापूसपेक्षा कमी भाव असल्याने जिल्ह्य़ात आंबट गोड गावरान आंब्याची चांगलीच चलती आहे.
या जिल्ह्य़ातील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, लोणार या घाटावरील भागात गावरान आंब्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. या तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर आमराया आहेत. निसर्गाने बऱ्यापैकी साथ दिल्याने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच गावरान आंबे मोटय़ा प्रमाणावर बाजारात येऊ लागले आहेत. आंबट-गोड चवीच्या या गावरान आंब्यांना जिल्ह्य़ातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. कोकणातून व दक्षिण भारतातून आलेले कलमी व संकरित आंबे रासायनिक पदार्थाद्वारे पिकविले जातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांना नागरिक प्रथम पसंती देतात.
गावरान आंब्याची शाक पिकली की, हे आंबे तोडले जातात. ग्रामीण भागात गवताच्या पेंढय़ांमध्ये या आंब्याच्या आढी घातल्या जातात. नैसर्गिकरित्या सात आठ दिवसात हे आंबे पिकल्यानंतर बाजारात आणले जातात. या आंब्याचे भाव कोकणच्या हापूस आंब्यापेक्षा बरेच कमी असतात. त्यामुळे त्याची खरेदी सर्व सामान्य माणसाला परवडण्यासारखी असते. यावर्षी गावरान आंब्याचे भाव चाळीस रुपयांपासून ८० रुपये किलोपर्यंत आहेत. अक्षय्य तृतीयेनंतर पाऊस पडेपर्यंत खेडय़ापाडय़ात आमरसाच्या जेवणावळी सुरू असतात. जावाई, व्याही व नातेवाईकांना आमरसाचाच पाहुणचार असतो. पोळी, आमरस, सांडई, कुरडई, भजी, कांद्याची भाजी, असा पाहुणचाराच्या म्येन्यूमध्ये समावेश असतो. पश्चिम वऱ्हाडातील लोक हा पाहुणचार अतिशय आवडीने खातात. या पाहुणचारासाठी यावर्षी गावरान आंब्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जाऊ लागला आहे.
गावरान आंबे साधारणत: जुलैपर्यंत उपलब्ध असतात. शेवटच्या टप्प्यात येणारे आंबट चवीचे उत्कृष्ट आंबे लोणच्यासाठी वापरले जातात. या आंब्याचे भाव यावर्षी तीस रुपयांवर जाण्याची आतापासूनच शक्यता वर्तविली जात आहे. बुलढाणा, चिखली व मेहकरच्या बाजारात यावर्षी गावरान आंब्याची आवक वाढली असून दर माफक असल्याने उलाढालही मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy sale of local mango in buldhana