कराड अर्बन बँकेने दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी ५ लाखाच्या निधीची तरतूद केली आहे. दहिवडी व म्हसवड येथील बँकेच्या शाखा परिसरातील सक्रिय सभासदांना शुध्द पाण्याचे कॅन पुरविण्यात येत आहेत. त्यासाठी बँकेने २ लाखाची तरतूद केली असून, उर्वरित ३ लाखाच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राज्यातील दुष्काळग्रस्तांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज असताना कराड अर्बन बँकेने केलेली आर्थिक मदत ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी असल्याचे सांगताना बँकेच्या एकंदर सामाजिक कार्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी रामास्वामी एन., जिल्हा सहकार उपनिबंधक आनंद कटके, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, प्रशासन विभागप्रमुख माधव माने, सेवक संघाचे अध्यक्ष दिलीप चिंचकर उपस्थित होते.