scorecardresearch

आश्वासनांपेक्षा कामातूनच बोलेन..!

नाशिकच्या मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारावर टाकलेला विश्वास अवर्णनीय आहे. आता विद्यमान खासदारांपेक्षा चारपट अधिक विकास कामे करून दाखविण्याचे आव्हान माझ्यासमोर असून भलीमोठी

नाशिकच्या मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारावर टाकलेला विश्वास अवर्णनीय आहे. आता विद्यमान खासदारांपेक्षा चारपट अधिक विकास कामे करून दाखविण्याचे आव्हान माझ्यासमोर असून भलीमोठी आश्वासने देण्यापेक्षा आता माझे कामच बोलेन..
हे म्हणणे आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासारख्या सर्वदृष्टय़ा बलाढय़ मानल्या गेलेल्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेले शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचे. विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना गोडसे यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे सांगितले.
२००९ मध्ये मनसेकडून निवडणूक लढविताना आपला अत्यंत कमी मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी मतदारांकडून आपणांस सहानुभूती मिळत असल्याचे प्रचार फेऱ्यांमधून जाणवत होते. त्यातच ग्रामीण भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे वैतागलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्यांकडून त्वरीत मदत देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल झाली नाही. त्यातच नुकसानग्रस्तांची विचारपूस करण्याऐवजी जिल्ह्याचे पालकमंत्री मतदानाचे राजकारण करत स्नेहभोजनात मग्न असल्याची छायाचित्रे प्रसिध्द होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांविषयी एक रोष निर्माण झाला. पालकमंत्र्यांवर भ्रष्टाचारासंदर्भात झालेले आरोप, गुंडगिरीला मिळणारे प्रोत्साहन, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन आणि नरेंद्र मोदी यांची लाट या सर्वाचा परिणाम आपले मताधिक्य वाढण्यात झाला, असे गोडसे यांनी नमूद केले.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी भरपूर विकास कामे केल्याचा गवगवा आतापर्यंत करण्यात येत होता. प्रसिध्दीचे तंत्र वापरण्यात वाकबगार असलेल्या भुजबळ यांनी विकास कामांचा केलेला गवगवा म्हणजे केवळ एक बुडबुडा आहे. ज्या उड्डाणपुलाचे श्रेय भुजबळ काका-पुतणे घेत आहेत. त्या उड्डाणपुलाच्या कामास केंद्रातील तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मंजुरी दिली होती. पालकमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता होती. परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळणारा सर्वाधिक निधीही ते येवल्यात पळवून नेत होते, असा आरोप गोडसे यांनी केला.
या विजयामुळे नाशिककरांच्या अपेक्षा निश्चितपणे वाढल्या असण्याची जाणीव आपणास आहे. नाशिककरांच्या अपेक्षेस उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करणार आहोत. परंतु आताच कोणतेही आश्वासन देणार नाही. जे काही बोलायचं ते कामातूनच बोलणार.  पाणी, रोजगार, रस्ते अशा मूलभूत समस्या दूर करण्यावर आपण भर देणार आहोत. विशेषत: पाणी आणि रोजगार या हे विषय सर्वसामान्यांना भिडणारे आहेत. नाशिक, सिन्नर औद्योगिक वसाहतीत ज्या कंपन्या बंद पडल्या असतील. त्या पुन्हा सुरू करणे, नवीन कंपन्या याव्यात पुन्हा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकेल. योजनांसाठी कुठून कसा पैसा आणावा याची माहिती असल्यास विकास कामे सहजपणे करता येतात. हे आपण जिल्हा परिषद सदस्य असताना सिध्द करून दाखविले आहे. आता लोकसभा मतदारसंघात करून दाखवू. विकास कामांसाठी दांडगी इच्छाशक्ती हवी. शिवाय खासदाराने जो लोकसंपर्क ठेवायला हवा. त्यात मागील पाच वर्षांत निर्माण झालेला अनुशेषही आपणास भरून काढावा लागणार आहे. आपण सहजपणे कोणासाठीही उपलब्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून दोघा ठाकरे बंधूंच्या स्वभावातील फरकही कळून आला. कोणताही निर्णय घेताना उध्दव ठाकरे हे सर्वाच्या संपर्कात राहतात. त्यामुळेच नाशिकमधील उमेदवार ठरवितानाही त्यांनी कोणतीही घाई न करता सर्वाशी चर्चा करूनच आपले नाव जाहीर केले. उध्दव ठाकरे हे सुस्वभावी आहेत. मनसेमध्ये मात्र हिटलरशाहीचा प्रत्यय आला. स्थानिक पातळीवर शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांसह महायुतीतील इतर सर्वानी आपल्यासाठी जीवापाड प्रयत्न केले.
त्याशिवाय मित्रमंडळी, नातेवाईकांचे जाळे यांचीही बहुमोल मदत झाली. प्रचाराच्या अखेरच्या आठवडय़ात तर संसरी गावातील प्रत्येक जण आपल्या प्रचारासाठी बाहेर पडला होता. या सर्वाचे ऋण आता पूर्वीच्या खासदारांपेक्षा चारपट काम करून फेडावे लागेल, असे गोडसे यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hemant godse beat chhagan bhujbal