भिवंडी-वाडा-मनोर या ६५ कि.मी लांबीच्या राज्यमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे ६० टक्क्य़ांहून अधिक काम अपूर्ण असूनही संबंधित सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अनगाव आणि वाघोटे येथे टोल वसुली सुरू केल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडी-वाडा-मनोर या ६५ कि.मी. लांबीच्या राज्यमहामार्गाच्या चौपदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सुरू आहे. वनखात्याच्या परवानगीअभावी या मार्गावरील साडेसात कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. या महामार्गादरम्यान तानसा, वैतरणा, पिंजाळ आणि देहेर्जा या नद्या आहेत. या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या चार पुलांच्या बांधकामापैकी दोन पुलांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. तसेच या नद्यांवर असलेले पूल हे ब्रिटिशकालीन असून ते नादुरुस्त आहेत. या पुलांची तात्पुरती डागडुजी करून त्यांना चौपदरीकरणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या महामार्गावरील लहानमोठय़ा मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. महामार्गालगत असलेल्या कारखान्यांच्या संरक्षण भिंती तसेच गावांमधील घरे यामुळे बऱ्याच भागाचे काम अद्याप झालेले नाही. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा आरोप अनेक प्रवाशांनी केला आहे. असे असूनही हे काम करणाऱ्या ठेकेदाराने अनगाव आणि वाघोटे येथे टोल वसुली सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावारण असून ही वसुली त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वाडा, भिवंडी ग्रामीण, मनोर परिसरांतील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे काम सुरू असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. आगवणे यांच्याशी संपर्क  साधला असता राज्य शासनाच्या आदेशानंतरच येथे टोल वसुली सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.