जालना येथे ६ ते १३ जानेवारीदरम्यान ‘स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या ‘इस्लामिक ज्ञानचाचणी’ परीक्षेस हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला आहे.
समितीचे समन्वयक अशोक कुलकर्णी यांनी परीक्षेचे आयोजक त्याचप्रमाणे परीक्षेच्या संदर्भातील पुस्तकाच्या लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार बैठकीत केली. श्रीकांत पांगारकर, अ‍ॅड. संजीव देशपांडे, आकाश महाराज आदी या वेळी उपस्थित होते. कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले की, सप्टेंबर २०१२ मध्ये आयोजित अशा प्रकारची परीक्षा हिंदूूंनी दाखविलेल्या जागृतीमुळे रद्द करण्यात आली होती. परंतु आता अशीच परीक्षा जानेवारी २०१३ मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या अभ्यासासाठी देण्यात येणारे पुस्तक आक्षेपार्ह आहे.
या पुस्तकात अन्य धर्मावर जहरी टीका करण्यात आलेली आहे. संबंधित प्रशासनाने जालना येथील या परीक्षेची परवानगी रद्द करून यापुढे या संघटनेस परीक्षा घेण्यास  परवानगी देऊ नये, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.