‘चिव चिव चिमणी अंगणात येई, पिलांसाठी मऊ मऊ चारा चोचीत नेई’ अशा बालगीतातून साद घालताच येणारी चिऊताई आज आपल्या नजरेआड झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, सिमेंट आणि काँक्रिटीकरणाचे चढणारे इमले, त्यात घरापुढील झाडेच नष्ट होत आहेत. या पाश्र्वभूमीवर, चिमण्यांना त्यांचे हक्काचे घरटे मिळावे यासाठी शहरातील औषध विक्रेते बिपीन बच्छाव यांनी चिमण्यांसाठी ‘मोफत घरकुल’ या उपक्रमाद्वारे विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
अगदी नकळत्या वयापासून ‘एक होता काऊ, एक होती चिऊ’च्या माध्यमातून भेटणारी चिमणी रोजच्या जगण्याचा भाग होऊन जाते. दिवसाची सुरुवात तिच्या चिवचिवण्याने होत असे. शहरीकरणामुळे ठिकठिकाणी वाढलेल्या इमारती, विकासकामांच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल, भ्रमणध्वनीचे मनोरे, बंद होत चाललेली उन्हाळी वाळवणाची पद्धत यामुळे चिमणी आपल्यावर रुसली आहे. दुसरीकडे, आधुनिकीकरणाच्या नावाखाली गरज नसताना वाढविलेल्या सोयी-सुविधांमुळे चिमण्यांचा घरातील वावरही कमी झाला आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात पक्षीतज्ज्ञांनी चिमणी ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर, चेतनानगर येथील औषध विक्रेते बिपीन बच्छाव यांनी वृक्षारोपण, वृक्ष दत्तक घेत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला आहे. शहरातून हरवत चाललेल्या चिमणीला मोफत घरकुलच्या माध्यमातून साद घातली आहे. यासाठी बच्छाव यांनी दुकानातील फर्निचरच्या कामातून उरलेल्या प्लायवूडचे तुकडे, फळ्यांतून चिमण्यांसाठी आधुनिक पद्धतीचे घरटे तयार केले आहेत. ही घरटी परिसरातील बंगले, इमारती, शाळा व सदनिका अशा ३० हून ठिकाणी वितरित करण्यात आली.
काही घरटय़ांत पावसाळ्यापूर्वीच चिमणीने काडी काडी जमवून आपले टुमदार घर सजविण्यास सुरुवात केली आहे. सुजाण नागरिकांनी त्या घरटय़ाशेजारी दाणा-पाण्याची व्यवस्थाही केली. हा उपक्रम असाच सुरू राहणार असून, चिमणी बचाव मोहीम अधिकाधिक व्यापक होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. चिमणी सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय असला तरी रोजच्या रहाटगाडय़ात तिच्याकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले आहे. या मोहिमेद्वारे तिला हक्काचे घर, अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न आहे. पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाला साथ द्यावी, तसेच सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पक्षी तसेच प्राण्यांसाठी घराजवळील सावलीत पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
चिमण्यांसाठी ‘मोफत घरकुल’
‘चिव चिव चिमणी अंगणात येई, पिलांसाठी मऊ मऊ चारा चोचीत नेई’ अशा बालगीतातून साद घालताच येणारी चिऊताई आज आपल्या नजरेआड झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, सिमेंट आणि काँक्रिटीकरणाचे चढणारे इमले, त्यात घरापुढील झाडेच नष्ट होत आहेत.

First published on: 24-05-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home for sparrows