वेश्या अड्डय़ाची चालक असलेली होमगार्ड महिला, दोन बांग्लादेशी तरुणीसह आठजणांना रविवारी न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामध्ये या रॅकेटची मुख्य मालकीण शेवंती ऊर्फ पूजा बिरू वास्कर, अनुराधा ऊर्फ पार्वती गणपती कांबळे, मोटारचालक व दलाल शिवाजी तुकाराम खोत, संजय सुकुमार आडके, अक्षय रामचंद्र पाटील यांचा समावेश आहे.
राजारामपुरी पोलिसांना आर. के. नगरजवळील ओढय़ाशेजारी एका डॉक्टराच्या बंगल्यात वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे समजले. तेथे पोलिसांनी छापा टाकला असता गृहरक्षक दलातील एक महिलाच वेश्याव्यवसायाची मालकीण असल्याचे उघडकीस आले. पूजा वास्कर ही बहुजन दलित सेनेची तालुका संघटक होती. तिचा बुरखा या कारवाईत फाटला. तिने गृहरक्षक दलाच्या गणवेशावर काढलेली छायाचित्रे, चार एटीएम कार्ड, बहुजन दलित सेनेचे आयकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी पोलिसांनी ढाका येथील दोन वेश्यांना ताब्यात घेतले. या मुलींना पुण्यातून कोल्हापुरात आणले होते.