महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेच्या गणित विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी दोन पेपरच्या दरम्यान सराव कालावधी देण्यात न आल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विषयांच्या शिक्षकांच्या संघटनेने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
बारावीची लेखी परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या वेळापत्रकात गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी आधीच्या प्रश्नपत्रिकेनंतर फक्त एकाच दिवसाचा सराव कालावधी देण्यात आला आहे. गणित विषय वगळता इतर सर्व विषयांसाठी दोन पेक्षा जास्त दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. गणित विषयाची प्रश्नपत्रिका ही इतर विषयांपेक्षा सर्वात जास्त गुणांची (८०)आहे. तसेच प्रश्नपत्रिका एक व दोन मिळून एकच पेपर घेण्यात येतो. गणित विषयाची काठिण्यपातळी, व्याप्ती व मर्यादा लक्षात घेता हा एक दिवसाचा कालावधी अत्यंत अपुरा आहे. अपुऱ्या सरावामुळे २०१५जेईईच्या मुख्य परीक्षेत आपले विद्यार्थी इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडण्याची शक्यता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय गणित परिषदेने २५ नोव्हेंबर २०१४ आणि आताच्या २ फेब्रुवारीला गणित परिषदेच्या शिष्टमंडळाने विभागीय अध्यक्ष अनिल पारधी यांना भेटून विद्यार्थ्यांवर या वेळापत्रकांमुळे होणाऱ्या अन्यायाची तीव्रता व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे नुकसान याची तीव्रता समजावून सांगितली. विद्यार्थ्यांच्या सह्य़ांचे निवेदन विभागीय मंडळाला देण्यात आले. यापूर्वी राज्य मंडळाला दिलेल्या निवेदनासंदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून राज्य मंडळाने गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेला किमान तीन-चार दिवसाचा कालावधीचा सराव कालावधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेचे दीपक कडू, विनायक बुजाडे, विजय तिडके आणि अरविंद जोशी यांनी केली आहे.