नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला घरोघरी घट बसविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात घरोघरी देवीचा जागर होणार आहे. महागाईमुळे घटस्थापनेसाठी साहित्यांच्या किमती वाढल्यामुळे भाविकांच्या खिशालाही काहीसा चाट बसणार आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात देवीच्या सजावटीच्या साहित्यांची अनेक दुकाने थाटली आहेत. देवीची साडी, चुनरी, ओटचे साहित्य, पूजा-प्रसाद साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. लहान आकारापासून मोठय़ा आकारातील घट उपलब्ध आहेत. काळय़ा रंगाचे साधे घटही बाजारात मिळत आहेत. तसेच रंगबेरंगी, आरसे, मोती, मनी, जरीचे वर्क ग्राहकांना आकर्षित करीत आहे. आकर्षक आरसे, मोत्याच्या माळा लावून सजवलेले घट दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहेत.
गरबा दांडियाची जय्यत तयारी
नवी मुंबईत असलेले नवरात्रोत्सव मंडळ व सामाजिक संस्थेच्या वतीने गरबा दांडियांचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी मंडळ व संस्थेच्या वतीने दांडिया खेळण्यासाठी रिंगण तयार करण्याचे काम जोराने सुरू असून काही मंडळांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गरबा-दांडियामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेतील विजेत्यांना व दांडियामध्ये सहभाग घेण्यासाठी उत्कृष्ट ड्रेस, गरबाकिंग, गरबाक्वीन यांची निवड करण्यात येते.

झेंडूची सजली दुकाने
झेंडूच्या फुलांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. घटस्थापनेच्या पाश्र्वभूमीवर अनेक विक्रेत्यांनी झेंडूची फुले बाजारात आणली असून ती ठिकठिकाणी दिसतात. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी झेंडूची लागवड कमी झाली आहे. बाजारात विक्रीस असलेल्या झेंडूच्या फुलांची ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. या दरात उद्या वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.