शहरात आयआरबी कंपनीने सुरू केलेली टोलवसुली बंद करण्यासाठी निदर्शने करणाऱ्या महापौरांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर कडकडीत बंद पाळून टोलला विरोध करण्यात आला. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. आगामी निवडणुकीत पक्षाशी असहकार आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला. महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. महायुतीच्या वतीने शासनाच्या व कंपनीच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले.
    टोलवसुली पुन्हा बुधवारी सुरू झाली. याच्या निषेधार्थ शिरोली टोल नाक्यावर महापौर सुनीता राऊत व अन्य नगरसेवकांनी निदर्शने केली. या वेळी पोलीस व नगरसेवक यांच्यात झालेल्या झटापटीत पोलिसांकडून महापौर राऊत यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. याचा निषेध म्हणून आज टोलविरोधी कृती समितीने ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन केले होते.  बंदमुळे आज कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली. बंदमधून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या होत्या. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.  
   सकाळी कृती समितीच्या चार ते पाच गटांनी रिक्षाचालकांना बंद पाळण्याची विनंती केली. यानंतर शहरातील विविध रिक्षास्थानकांवरील रिक्षा बंद करण्यात आल्या. आजच्या संपात कोल्हापूर महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिकेची परिवहन व्यवस्था असलेल्या केएमटीच्या सर्व बससेवा बंद होत्या. यामुळे शहर व शहराबाहेरील प्रवाशांचे हाल झाले. बंदकाळात मात्र एसटी सेवा सुरूच होत्या. शहरातील राजारामपुरी, कपिलतीर्थ, शाहू उद्यान, पाडळकर मार्केट आदींसह विविध ठिकाणची भाजी मंडई बंद होती. बाजारपेठेची मुख्य ठिकाणे असलेले महाद्वार रोड, भवानी मंडप, शिवाजी मार्केट, लक्ष्मीपुरी, गुजरी, शाहूपुरी व्यापारी लाइन, लक्ष्मीपुरी आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यामुळे कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली.
   महापौर मारहाणीचा निषेध नोंदविण्यासाठी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. या वेळी झालेल्या सभेत येत्या दोन दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी टोलबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत पक्षाशी असहकार आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला.
    शिवसेना, भाजप, आरपीआय, स्वाभिमानी व आरएसपी या महायुतीच्या वतीने राज्य शासन व आयआरबी कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात आला. महापालिका चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजी चौकात विसर्जति झाला. येथे शासनाच्या व कंपनीच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. या वेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे  आदींसह कार्यकत्रे, पदाधिकारी उपस्थित होते.
    महापालिका पदाधिकाऱ्यांवर लाठीहल्ला करून अपमानास्पद वागणूक देण्याचा आदेश देणाऱ्या अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक, शहर पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक व टोलविरोधी कृती समितीतर्फे पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांना देण्यात आले.महावीर कॉलेज समोरील एका कार्यालयावर, बावडा येथील एका मोबाइल कंपनीच्या दुकानावर, खानविलकर पेट्रोल पंपासमोरील एका दुकानावर, बावडा येथील भगवा चौकातील दारू दुकानावर जमावाकडून किरकोळ दगडफेक करण्यात आली.