मनसेच्या आंदोलनाला बारभाई नेत्यांचा खोडा

राजसाहेबांनी आदेश दिला आणि मनसैनिकांनी तो पाळला नाही, असे आजवर फारसे कधी घडले नाही. मुंबई, नाशिकच्या तुलनेत ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था तशी तोळामोळाच. तरीही साहेबांचा आदेश आला आणि ठाण्यात खळळ्् ऽऽ खटय़ाक झाले नाही, असे चित्र अपवादानेच दिसायचे.

 राजसाहेबांनी आदेश दिला आणि मनसैनिकांनी तो पाळला नाही, असे आजवर फारसे कधी घडले नाही. मुंबई, नाशिकच्या तुलनेत ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था तशी तोळामोळाच. तरीही साहेबांचा आदेश आला आणि ठाण्यात खळळ्् ऽऽ खटय़ाक झाले नाही, असे चित्र अपवादानेच दिसायचे. एलबीटीविरोधात राज्यभरातील व्यापारी सर्वसामान्यांना वेठीस धरू लागताच राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आणि ठाण्यातही मनसैनिक कामाला लागले. दुकाने उघडा, अन्यथा खळळ्् ऽऽ खटय़ाकसाठी तयार राहा, असा इशाराही दिला गेला. दादागिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कुणीतरी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवते आहे, हे पाहून ठाणेकरही सुखावले. मात्र, मोठा गाजावाजा करीत सुरू झालेले मनसेचे हे आंदोलन पक्षातील इनमिन ४०-५० कार्यकर्त्यांपुरते का मर्यादित राहिले, याचा शोध राजगडावरून सुरू झाला आहे.
मुजोर व्यापाऱ्यांना हिसका दाखविण्यासाठी पक्षाचे शहर अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांचा एक मोठा गट रणनीती आखत असताना शहर कार्यकारिणीचे हे आंदोलन कसे फसेल, यासाठी मनसेतीलच काही बारभाई नेते व्यूहरचना आखत होते, अशा तक्रारी आता राजगडावर पोहचू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, बेकायदा बांधकामांविरोधात ठाणे बंद करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची दबंगशाही मोडण्यासाठी मनसेतील एक गट अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरला असताना तेव्हाही हे आंदोलन एकटे कसे पडेल, याची तजवीज या बारभाई नेत्यांनी करून ठेवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ िशदे यांच्या पंखाखाली जात ठाण्यातील आपल्या सुभेदाऱ्या टिकविण्यात मग्न असलेल्या मनसेतील काही नेत्यांच्या सविस्तर तक्रारी राजगडावर करण्यात आल्या असून आपल्याच पक्षाचे आंदोलन नासवणारे पक्षातील या नासक्या आंब्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल आता मनसैनिकांमधून उपस्थित होत आहे.   
शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराच्या पारडय़ात ठाणेकरांनी मतांचे भरभरून दान टाकले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजन राजे यांचा जेमतेम अडीच हजार मतांनी पराभव झाला आणि तोही पक्षांतील ठरावीक नेत्यांनी घडवून आणल्याचा आरोप तेव्हा जाहीरपणे करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला तब्बल एक लाख ३४ हजार मते मिळाली, त्यापैकी ९९ हजार मते ही ठाण्यातील तीन विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. ठाणेकर मनसेच्या उमेदवारांना भरभरून मते देत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर पक्षात लाथाळ्या सुरू असल्याने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला जनाधार गमवावा लागला.
 नासके आंब्यांचे दुखणे कायम
महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ठाण्यात आलेले राज ठाकरे यांनी पक्षातील नासके आंबे बदलण्याची घोषणा केली. ही घोषणा प्रत्यक्षात उतरेपर्यंत वर्ष उलटले. अखेर नीलेश चव्हाण यांची शहर अध्यक्षपदावर निवड करीत राजगडावरून ठाण्यातील सर्व प्रस्थापितांना धक्का देण्यात आला. सध्या पक्षाचे माजी शहर अध्यक्ष हरी माळी यांनी नवे अध्यक्ष चव्हाण यांच्याशी जुळवून घेतल्याने माळी यांना मानणारा बराचसा वर्ग नव्या अध्यक्षांसोबत दिसून येतो. मात्र, माळी अध्यक्ष असताना त्यांना सतत असहकार करणारे पक्षातील काही ठरावीक नेते चव्हाण यांनाही अडचणीत आणू लागले आहेत. एलबीटीला विरोध करीत बंदची हाक देणाऱ्या व्यापाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी आंदोलनाचा बार फुसका कसा ठरेल, यासाठी काही नेत्यांची प्रयत्न केल्याच्या तक्रारी राजगडावर करण्यात आल्या आहेत.
नौपाडा, पाचपाखाडी भागातील काही ठरावीक बडय़ा व्यापाऱ्यांच्या आग्रहामुळे सुरू झालेल्या या बंदला वागळे, गांधीनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर भागातील लहान-मोठय़ा व्यापाऱ्यांचा तसा विरोधच होता. त्यामुळे ठरावीक व्यापाऱ्यांची मुजोरशाही मोडून काढण्याची व्यूहरचना मनसेने आखली होती. मात्र, या मंडळींना साथ देण्याऐवजी व्यापाऱ्यांच्या प्रभावशाली गटाला आतून मदत केली गेल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. पक्षातील नासके आंबे बदलण्याची भाषा एकीकडे होत असताना राज ठाकरे यांचे आदेश मोडून काढण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांवर आता राजगडावरून कोणती कारवाई होते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

व्यापाऱ्यांचा बंदविरोधी आंदोलनात पक्षातून खोडा घातल्याची कोणतीही तक्रार आपण राजगडावर केलेली नाही, अशी प्रतिक्रिया नीलेश चव्हाण यांनी वृत्तान्तला दिली. ठाणेकरांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरणे हे आमचे कर्तव्य होते. त्यामुळे कुणी काय केले याचा विचार करीत बसण्यात वेळ वाया घालविणाऱ्यांपैकी मी नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hurdles in mns agitation