सच्चर समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीबाबत समाधानी नसल्याचा घरचा अहेर खासदार हुसेन दलवाई यांनी काँग्रेसला दिला. मुस्लिमांमधील किंबहुना सर्वच गरीब मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
देशात सर्वाधिक मागासलेपण मुस्लिम समाजात असून उच्च शिक्षणात त्यांचे प्रमाण तीन टक्केही नाही. मदरशात शिक्षणाचे प्रमाण केवळ चार टक्केच आहे. गळतीचे प्रमाण मुस्लिमांमध्ये सर्वाधिक आहे. या समाजात बाल मजुरीचे प्रमाण ७२ टक्के आहे. दलित, आदिवासींपेक्षाही मुस्लिम मुले मागे आहेत. दारिद्रय़रेषेखालील मुस्लिमांचे प्रमाण तीस टक्के आहे. आधुनिक शिक्षणाचे दरवाजे बंद असल्याने ही स्थिती झाली आहे. एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, ही मध्यमवर्गीय मुस्लिमांची जबाबदारी वाढली आहे. आयआयटी हे स्पप्न असले तरी किमान आयटीआय द्यायला हवे. मुले डॉक्टर, वैज्ञानिक झाले पाहिजेत. कुराण शरीफ वाचणे कठीण आहे. दोन वर्षांत मुस्लिम मुले ते पाठ करतात, याचाच अर्थ ते शिकू शकतात, याकडे दलवाई यांनी लक्ष वेधले.
श्रीमंत मुस्लिमांची मुले शिकली आहेत. गरीब मुस्लिमांची नाहीत. सच्चर समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीबाबत समाधानी नाही. केवळ गरीब मुस्लिमच नव्हे तर सर्व गरिबांची मुले शिकली पाहिजेत, अशी भूमिका असल्याचे सांगून यास उशीर झाला याची कबुली दलवाई यांनी दिली. निवडणुका जवळ आल्या म्हणून हे करीत नाहीतर गेल्या वर्षीपासूनच हा विषय मनात आला. यात कुठलेही राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २९ व ३० मे मुंबईत मौलाना आझाद विचार मंचतर्फे मुस्लिम शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री रहमाान खान, खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी होतील.
मुस्लिम समाजातील शिक्षणविषयक यथादर्शन किंवा विविधांगी दृष्टीकोन, जमातवाद- मुस्लिम समाजाच्या शिक्षणातील अडथळा, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासंदर्भात मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अपेक्षा व मागण्या, मुस्लिम मुलींचे शिक्षण, प्रोत्साहन व व्युहरचना, मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी औकाफ निधीचा वापर, मुस्लिम शैक्षणिक संस्थांपुढील आव्हाने आणि उपाययोजना, मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आर्थिक नियोजन आदी अनेक विषयांवर त्यात चर्चा होणार आहे. माजी आमदार एस.क्यू. जमा, आरएम खान नायडू, डॉ. नदीम, डॉ. कुरेशी आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.