भारतीय जनता पक्षातील एकमेकांचे पाय खेचण्याची प्रवृत्ती आपल्याला संपवायची आहे, असे जाहीरपणे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. पंकजा पालवे-मुंडे यांनी त्यासाठी नेते व कार्यकर्ते अशा दोघांनीही आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला आहे.
पक्षाच्या वतीने रविवारी दुपारी टिळक रस्त्यावरील तुषार गार्डनमध्ये ‘युवा निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार दिलीप गांधी होते. जिल्हाध्यक्ष आ. राम शिंदे, आ. शिवाजी कर्डिले या वेळी उपस्थित होते. आगामी महापालिकेच्या निवडणूक पार्श्र्वभूमीवर खा. गांधी यांचे चिरंजीव युवा नेते सुवेंद्र गांधी यांना ‘प्रोजेक्ट’ करण्यासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यात, सुवेंद्र यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या समर्थानाच्या घोषणाही देण्यात आल्या.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवाशक्ती संघटित करून, त्याद्वारे केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन घडवण्याचा व येत्या दि. ३० रोजी भाजयुमोच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्याचा मनोदयही आ. पालवे-मुंडे यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याची वाढली आहे, कोणी मोठे होऊ लागले की त्याला मागे ओढले जाते, आपण तर मराच, परंतु आपल्याबरोबर इतरांनाही मारा, अशी ही प्रवृत्ती आहे, ती आपल्याला संपवायची आहे, देशात व राज्यात भाजपला अनुकूल वातावरण असताना, पक्षातील बुरसटलेले विचारही दूर करण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्तेची, पैशाची व गुंडांची मस्ती जिरवण्यासाठी, बलात्कारी, महागाई वाढवणारे सरकार बदलण्यासाठी भाजपमध्येही १९९५ प्रमाणे इच्छाशक्ती, उत्साह निर्माण व्हायला हवा, सरकारचे घोटाळे रस्त्यावर मांडायचे तर आपल्यातही एकजूट हवी, आता मोदींमुळे आपल्यातील नेतृत्वाचाही प्रश्न संपला आहे, आघाडी सरकारला लोक वैतागले असल्याने भाजपला अनुकूल वातावरण आहे, लोक मत देण्यास तयार आहेत, परंतु पक्षात पदर पसरायलाच कोणी नाही, असे होऊ नये असा टोलाही पालवे-मुंडे यांनी लगावला.
गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जिल्ह्य़ातील विधानसभेच्या पाचही जागांवर विजय मिळवायला हवा, असे सांगताना खा. गांधी यांनी विजयासाठी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभारावर नरेंद्र मोदी हेच उत्तर असल्याचा दावा त्यांनी केला. आ. शिंदे यांनी दोन तीन दिवसांतच पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळेल, असे जाहीर केले. मित्रपक्ष असला तरी शिवसेनेकडून आपण का डावलले जातो, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा, असे आवाहन  शिंदे यांनी केले. आघाडी सरकारला वीजबिल माफी व वीज कपात रद्द करण्याच्या घोषणेचा विसर पडल्याने मंत्र्यांना जिल्ह्य़ात फिरू देऊ नका, असे आवाहन आ. कर्डिले यांनी केले. भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सभेत सर्वच वक्तयांनी निषेध केला.
सुवेद्र गांधी यांनी सर्वाचे स्वागत केले. उपमहापौर गीतांजली काळे, प्रदेश सरचिटणीस विवेक चांदवाडकर, शिवाजी शेलार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे तसेच पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 कर्जतमधील अंबालिका कारखाना परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमबाह्य़पणे रस्त्यांवर सुमारे ५२ कोटी रु. खर्च केले, हे काम करताना शेती व सामान्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आल्याची तक्रार सुवेंद्र गांधी यांनी केली, त्यावर आ. पंकजा पालवे-मुंडे यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याचे भाषणात जाहीर केले.