नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी आपण पुन्हा इच्छुक आहोत, कोणी कितीही प्रयत्न केले तरी तिकीट मलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी कोणी कितीही अफवा उठवल्या तरी आपला जन्म आणि अंतही भाजपमध्येच आहे, असे ठोस प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना केले.
संसदेचे शेवटचे सत्र संपल्यानंतर खा. गांधी काल येथे आले, त्यानंतर आपल्या कारकीर्दीचा आढावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना सादर केला. या वेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी उपस्थित होते. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकालाचा लेखाजोखा ‘अर्पण’ या पुस्तिकेद्वारे मांडणार आहोत, त्याचे प्रकाशन मार्चच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेली पाच वर्षे बरोबर असणारे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उद्या, सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, त्याबद्दल विचारणा केली असता, गांधी यांनी त्यांनी असे का केले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे स्पष्ट केले. भाजपची उमेदवारी १५ मार्च दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे, लोकशाहीत कोणीही पक्षाकडे उमेदवारी मागू शकतो, उमेदवारी जाहीर होण्यास विविध कंगोरे आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पक्षातून तुमच्या उमेदवारीला विरोध झाला आहे, याबद्दल गांधी म्हणाले की, याचे योग्यवेळी उत्तर देऊ, कोणी काय बोलावे, कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ‘चांगले पेरा म्हणजे चांगले उगवेल’ या तत्त्वाने आपण पक्षात काम करतो, परंतु उमेदवारी मलाच मिळेल, असा विश्वास वाटतो. आपल्याला उमेदवारी मिळण्याचा व अर्बन बँकेतील तक्रारींचा काही संबंध नाही, बँकेविषयी तक्रारी करणाऱ्यांचे बँकेत योगदान तरी काय आहे?, सध्याही माझ्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु माझा जन्म आणि अंतही भाजपमध्येच आहे, सन २००४ मध्ये केंद्रीय मंत्री असूनही मला तिकीट नाकारले गेले होते, त्या वेळी इतर पक्षांतून ‘रेडकार्पेट’चे निमंत्रण होते, त्यावेळी गेलो नाही तर आता काय जाणार?
पाच वर्षांत २ हजार कोटी रु.चा निधी
गेल्या पाच वर्षांत विविध योजना व विकास कामांच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदारसंघात तब्बल १ हजार ९५९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यातील ४५० कोटी रु. दुष्काळी कामांसाठी उपलब्ध झाला. आताही सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम, गॅस कंपन्या, राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुशोभीकरण करण्यासाठी, जिल्ह्य़ातील ३२ वास्तूंसाठी १६ कोटी रु., अद्ययावत स्मशानभूमीसाठी २० कोटी रु., पीएमजेएसवायद्वारे ७४ किमीच्या रस्त्यांसाठी ४० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, ही कामे लवकरच आचारसंहितेपूर्वी मार्गी लागतील. आपण केलेल्या प्रयत्नातून नगर-पुणे रेल्वे मार्ग सर्वेक्षणाचे काम मार्गी लागले, या रेल्वेमार्गामुळे नगरचा विकास लांब नाही, असे खा. गांधी म्हणाले.