गैरसमजामुळेच विदर्भात सैन्यभरतीला कमी प्रतिसाद -ब्रिगेडिअर नरिंदरसिंग
महाराष्ट्रातील इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात सैन्य भरतीला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या सहज उपलब्ध संधी व सैन्यदलातील नोकरीविषयी असलेले गैरसमज यामुळेच प्रतिसाद कमी असल्याचे मत लष्कराच्या भरती विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर नरिंदरसिंग यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केली. राज्य सरकारची इच्छा असेल तर नक्षलवादग्रस्त भागात भरती मोहीम राबविण्याची लष्कराची तयारी आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय लष्करात दरवर्षी ३ टक्के जागा रिक्त होतात. त्या भरण्यासाठी देशपातळीवर भरती प्रक्रिया राबवण्यात येते. महाराष्ट्राच्या वाटय़ाला दरवर्षी ६ ते ७ हजार जागा येतात. या जागा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातून भरण्यात येतात. लष्कराला दरवर्षी गोवा व मुंबईतून भरतीसाठी अजिबात प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातून भरतीला भरपूर प्रतिसाद मिळतो. त्या तुलनेत विदर्भात मात्र युवकांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे, अशी खंत सिंग यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या वाटय़ाला येणाऱ्या एकूण जागांपैकी किमान २० टक्के जागा इतर विभागाच्या तुलनेत मागास असलेल्या विदर्भातून भरल्या जाव्यात, अशी लष्कराची अपेक्षा असते. प्रत्यक्षात युवकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने दरवर्षी ते शक्य होत नाही. सध्या राज्यात जळगाव व चंद्रपूर येथे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जळगावला ४० हजार युवकांचा प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत येथे मिळणारा प्रतिसाद कमी आहे. येथे या प्रक्रियेत केवळ तीन हजार युवक सहभागी झाले. नागपूर व अमरावती येथेही ही प्रक्रिया काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली. तेथे पाच ते सहा हजार युवकांचा प्रतिसाद मिळाला. इतर विभागाच्या तुलनेत हा प्रतिसाद अतिशय कमी आहे. विदर्भाचा भाग मागासलेला असला तरी या भागात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे युवकांचा कल स्थानिक संधी शोधण्याकडे जास्त आहे. लष्कराची नोकरी त्या तुलनेत थोडी कठीण असली तरी यात मोठय़ा संख्येत युवकांनी सहभागी व्हावे, यासाठी युध्द पातळीवर प्रचार मोहीम राबवली जाते. या भागात लष्कराच्या नोकरीविषयी गैरसमज जास्त आहेत. ते दूर करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
पूर्व विदर्भातील काही जिल्हे नक्षलवादाने ग्रस्त आहेत. या जिल्हय़ांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथे पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद मिळतो. नक्षलवादग्रस्त भागातील तरुण मोठय़ा संख्येने सैन्यदलात दाखल व्हावेत, अशी लष्कराची इच्छा आहे. त्यामुळे गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्य़ात सुध्दा भरती प्रक्रिया राबवण्याची लष्कराची तयारी आहे, मात्र ही प्रक्रिया राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असते. गेल्या वर्षी गडचिरोलीत भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी पूर्ण झाली होती. अखेरच्या क्षणी हा बेत बारगळला. प्रशासनाने होकार दिल्यास लष्कर पुढील वर्षी गडचिरोलीत ही प्रक्रिया राबवण्यासाठी तयार आहे, असे मत सिंग यांनी व्यक्त केले.