पुण्यातील सहकार नगरमध्ये अलिकडेच एक नवीन इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. अशाच पध्दतीची, कोणतेही नियम न पाळणारी, पालिकेच्या परवानग्या न घेतलेली अनधिकृत बांधकामे कल्याण डोंबिवलीत सुरू आहेत. महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे नगरविकास विभागानेच या प्रकरणात लक्ष घालून पालिका प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी एका जागरूक नागरिकाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव जयंत कुमार बाठिया, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांना अनधिकृत बांधकामांच्या छायाचित्रांसह देण्यात आल्या आहेत.  अनधिकृत बांधकामांच्या यादीमध्ये डोंबिवलीतील पं. दिनदयाळ रोडवर प्राथमिक शाळेच्या आरक्षित भूखंडावर उभारलेली इमारत, कोपर पूर्व रेल्वे स्टेशनलगतच्या चाळी, महाराष्ट्रनगर, आदी बांधकामांचे संदर्भ या तक्रारीत देण्यात आले आहेत.