घोडबंदर येथील माजिवडा भागामधील वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना वनविभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली असून न्यायालयाने या तिघांची जामिनावर सुटका केली आहे.
पिंटू मऱ्या वड , रतन रामा रावते आणि सुरेश जानू बोचल अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनक्षेत्रातील येऊर परिमंडळाच्या हद्दीत कावेसर-माजिवडा भाग येत असून येथील शासकीय वन जमिनीवरील झाडे-झुडपे तोडून तिघांनी ती जागा साफ केली होती. तसेच या जागेवर अतिक्रमण करण्याची तयारी सुरू केली होती. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली. दरम्यान, त्यांची न्यायालयात जामिनावर सुटका झाली आहे, अशी माहिती वन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.