पुण्यातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क वसुली होत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, असा कायदा आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी पुण्यातील स.प. महाविद्यालयामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्कवसुली करण्यात येत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी पुण्यातील इतर महाविद्यालयांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिद्धार्थ शर्मा या विद्यार्थ्यांने, पुण्यातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्कवसुली केली जात असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुणे विद्यापीठ आणि विधी महाविद्यालयामधून माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीचा दाखला याचिकाकर्त्यांने दिला आहे.