दिवाळीच्या सुटीनंतर गतिमान झालेल्या पूर्व प्राथमिक शाळेतील प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागाने चाप लावला असला तरी शहरातील अनेक शाळांमध्ये खुष्कीच्या मार्गाने ती राबविली जात असल्याने पालक संभ्रमात सापडले आहेत. शिक्षण विभागाने नोव्हेंबर व डिसेंबरमधील प्रवेशांवर र्निबध घातले आहेत. हे प्रवेश अनधिकृत असल्याचे बजावण्यात आले असले तरी शहरातील काही शाळांमध्ये छुप्या पध्दतीने प्रवेश प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. काही शाळांनी प्रवेश अर्जांऐवजी पालकांकडून चौकशी अर्ज भरुन घेतले. शिक्षण विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन चाललेली प्रवेश प्रक्रिया पालकांना आर्थिक भरुदड देणारी ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील बहुतेक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक (प्री-प्रायमरी) शाळांचे प्रवेश आजवर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात होत असत. त्यामुळे या काळात अनेक शाळांसमोर सकाळपासून प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागल्याचे चित्र दरवर्षी पहावयास मिळते. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व शाळांची प्रवेश प्रक्रिया एकत्रित होणे अपेक्षित असताना काही शाळा प्रवेश प्रक्रियेचे सोपस्कार डिसेंबरमध्ये पूर्ण करुन घेतात. याबद्दल पालकांच्या तक्रारी आल्यावर नियमाचा भंग करून प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. मात्र, शहर व परिसरातील काही शाळांनी त्याकडे कानाडोळा करुन प्रवेश प्रक्रिया चालविली आहे. पालकांना आकर्षित करण्यासाठी काही शाळांनी तर याच काळात ‘मुलांचा सर्वागिण विकास’, मुलांसाठी भविष्य नाही तर उद्याच्या भविष्यासाठी मुले घडवत आहोत..’ अशी जाहिरातबाजीही केली. प्रवेश अर्जाची विक्री केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे काही चाणाक्ष संस्थाचालक पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी पालकांकडून चौकशी अर्ज भरून घेत आहेत. त्यासाठी पालकांना शुल्क मोजावे लागते. मराठी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेशासाठी कमीत कमी १०-१५ हजार रुपये वार्षिक शुल्क आहे. या शिवाय, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वाहनाचा खर्च वेगळा द्यावा लागतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळेसाठी तर पालकांना अग्निदिव्य पार करण्याची अनुभूती मिळत आहे. शाळेचा लौकिक, त्यांच्या जाहिराती याला बळी पडून पालक वर्ग काही विशिष्ट शाळांकडे आकर्षिले जात आहेत. या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेचे सोपस्कार तर आणखी वेगळे आहेत. चौकशी अर्जात आर्थिक उत्पन्नाचा संपूर्ण तपशील, माध्यम जगतातील आवडीनिवडी, मुलांसाठी कुठपर्यंत तडजोड करण्याची तयारी आहे आदींसह काही भावनिक प्रश्नांचा समावेश असणारी प्रश्नावली भरून घेतली जाते. या अर्जाची पूर्तता झाल्यावर काही शाळांमध्ये पाल्य व पालकांच्या मुलाखतीसाठी प्रती विद्यार्थी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यात तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला तरच पुढील प्रक्रियेला सुरूवात होईल, अशी व्यवस्था आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत कमीत कमी २० हजार रुपयांपासून ते जास्तीतजास्त ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क पालकांना सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी मुलांचे शैक्षणिक साहित्य, त्यांचा गणवेशाचा खर्च अंतर्भूत आहे तर काही ठिकाणी तो वेगळा करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थी वाहतुकीचा खर्च प्रती किलोमीटर प्रमाणे वेगळा राहणार आहे. प्रवेशासाठी केलेला हा खटाटोप सरकारी नियमांमुळे अडचणीत तर सापडणार नाही ना, याची धास्ती पालकांना आहे.