शहरातील मुख्य मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, आनंदवल्ली भागात गणेश विसर्जनासाठी त्या त्या परिसरातील वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील, असे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी म्हटले आहे.
शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. दुपारी बारा वाजेपासून वाकडी बारव (चौक मंडई) येथून सुरू होणारी ही मिरवणूक दादासाहेब फाळके रस्ता, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉईंट, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नलमार्गे अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, म्हसोबा पटांगण विसर्जन ठिकाण अशी निघणार आहे. मिरवणूक काळात उपरोक्त सर्व मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात पंचवटी डेपो व निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका चौकातून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस शालीमार येथून सुटतील. नाशिकरोड विभागातील गणपती विसर्जन मिरवणूक बिटको चौक, शिवाजी महाराज पुतळा, सुभाष रस्ता, देवळाली गाव वालदेवी नदीपर्यंत निघणार आहे. दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत या भागातील वाहतूक बंद राहणार आहे. या दिवशी शहर वाहतुकीच्या बसेस दत्त मंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथून परत येतील. सिन्नरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उड्डाणपुलावरून जातील व येतील, असे सरंगल यांनी म्हटले आहे. नाशिकरोड विभागातील नांदुर नाका ते सैलानी बाबा चौक व सैलानी बाबा चौक ते नांदुरनाका पर्यंतचा मार्ग दोन्ही बाजुच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. विसर्जनासाठी गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली येथेही मोठी गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन आनंदवल्ली नदीपात्राजवळ चांदशी गाव ते आनंदवल्ली नदीपात्र व आनंदवल्ली नदीपात्र ते चांदशी गाव पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.