दिवसाकाठी तब्बल सोळा तास भारनियमन होत असताना उर्वरित आठ तासांच्या कालावधीतही ग्रामीण भागांत वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले असून महावितरण कंपनीने या संकटातून शेतकऱ्यांची मुक्तता करावी, अशी मागणी भाजपचे मालेगाव तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी केली आहे.
पवार यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीजपुरवठय़ाअभावी शेतकऱ्यांच्या कशा हालअपेष्टा सुरू आहेत याचे सविस्तर कथन करून या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी साकडे घातले आहे. सत्ताधारी आघाडीच्या वतीने राज्य भारनियमनमुक्त करण्याचे ढोल वारंवार बडविले जात असले तरी सद्यस्थितीत ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेल्या भारनियमनाबद्दल या निवेदनात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. नियमित भारनियमनाव्यतिरिक्तदेखील कित्येकदा वीज नसते. बऱ्याच वेळा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषीपंप सुरू होऊ शकत नाहीत. अशा वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कित्येक तास ताटकळत राहावे लागत असल्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यासाठी महावितरण कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीबद्दलही पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित रोहित्राद्वारे वीजपुरवठा होत असलेले बहुसंख्य कृषीपंप वीजग्राहक हेथकबाकीदार नसतील तरच नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करण्याचा कंपनीचा खाक्या असतो. अशा वेळी जे ग्राहक थकबाकीदार नसतात त्यांच्यावर तो मोठा अन्याय ठरत असतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत केविलवाणी आहे. याचा विचार करता कंपनीने थकबाकीच्या नावाखाली अशा प्रकारे कुणालाच वेठीस धरू नये अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय गणेशोत्सव काळातही ग्रामीण भागांत काही ठिकाणी भारनियमन करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.