सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शेतक ऱ्यांना लाभ

अनेक अन्नद्रव्यांचा समावेश असलेल्या तलावातील गाळाने पीक उत्पादनात भरघोस वाढ झाल्याचा अनुभव सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. तलावातील गाळ शेतात टाकण्याचा कार्यक्रम यावर्षी सावनेर व कळमेश्वर तालुक्यात राबविण्यात आला.
कळमेश्वर तालुक्यातील पिल्कापार पाझर तलावातून १७५२ घ.मी., तेलगावच्या केसरनाला प्रकल्पातून ३६८१ घ.मी., चंद्रभागा-सुसुंद्री जलाशयातून ४३६७ घ.मी., धापेवाडा नाल्यातून ५९७२ घ.मी. असा एकूण २४ हजार ६२३ घ.मी. गाळ काढण्यात आला. जवळपास साडेसात हजार बैलगाडय़ा गाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. या कार्यक्रमामुळे पीक उत्पादन ३० ते ४० टक्के वाढले आहे, असे आमदार सुनील केदार यांनी शेतकरी मेळाव्यात सांगितले.
कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळाव्यात नुकताच झाला. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार केदार उपस्थित होते. तलावाचे कालवे खराब झाल्यामुळे पाणी शेतात पोहोचत नसल्याचे शेतक ऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या कालव्यांची लवकर डागडूजी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देल्याचे आमदार केदार म्हणाले. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी अडविण्याचा प्रेरणादायी प्रयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तलावातील गाळामुळे पीक उत्पादन वाढल्याचे अनेक शेतक ऱ्यांनी मेळाव्यात अनुभव कथन केले. संत्रा उत्पादक तारासिंग काळे यांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मेळाव्याला पंचायत समिती सभापती वैभव घोंगे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर कुंभारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक भागवत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे, समन्वय समिती अध्यक्ष श्रीराम काळे, गुणवंत नागपुरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती अनिल डोंगरे यांनी तर आभार कृषी अधिकारी देवेंद्र रेवतकर यांनी केले.