मुंबईतील नेहरू तारांगणला ३७ वष्रे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुढील एक आठवडा सर्वाना ताऱ्यांच्या विश्वात रममाण होण्याची संधी मिळणार आहे. २५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रम, स्पर्धा यांची रेलचेल असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे वैज्ञानिक आणि अंतराळ क्षेत्रातील ज्ञान आजमावण्याची व त्याचा विकास करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २५ फेब्रुवारी रोजी अंतराळ चित्रकला स्पध्रेपासून होणार आहे. ही स्पर्धा चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी अंतराळ कविता स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून विद्यार्थ्यांना अंतराळाशी संबंधित विषयावर कविता करायला सांगण्यात येणार आहे. सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा ठेवण्यात आली असून ही स्पर्धा २८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. प्रत्येक शाळेतून तीन विद्यार्थी या स्पध्रेत सहभागी होऊ शकतात. तर एक मार्च रोजी अंतराळ प्रश्नमंजुषा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. यामध्येही प्रत्येक शाळा तीन विद्यार्थ्यांना पाठवू शकतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून नाव नोंदणी करावी लागणार आहे. निबंध, कविता आणि चित्रकला स्पध्रेसाठी विषय आयत्यावेळी देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा सकाळी १० ते एक या वेळात पार पडणार आहेत. स्पध्रेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी तारांगणात सुहास नाईकसाटम यांच्याशी २४९२४१३३ वर संपर्क साधावा