जायकवाडी धरणाला हक्काचे पाणी देण्याच्या विरोधात केल्या जाणाऱ्या ‘कोल्हेकुई’त सहभागी झालेले कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उद्या (मंगळवारी) नांदेडला होत असलेल्या सिंचन परिषदेचे उद्घाटक आहेत. मात्र, विखे यांना देण्यात आलेल्या निमंत्रणावरून संयोजक अडचणीत आले आहेत. विरोध करणाऱ्या व्यक्तीला उद्घाटक म्हणून का पाचारण केले, या प्रश्नाचे उत्तर न देताच सिंचन सहयोगचे अध्यक्ष दि. मा. मोरे यांनी स्थानिकांकडे बोट दाखवले आणि एक वरिष्ठ अधिकारी निरुत्तर झाले.
शहरातील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या कुसुम सभागृहात पंधराव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेला उद्या सुरुवात होणार आहे. परिषदेचा उद्देश व कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत उद्घाटक म्हणून विखेंचे नाव कसे आले, याची विचारणा करण्यात आली. जायकवाडीस पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्यांना उद्घाटक म्हणून कसे बोलवता, असे विचारल्यावर मोरे निरुत्तर झाले आणि शासकीय सेवेत मोठय़ा हुद्दय़ावर असणाऱ्या घोटे यांनी तर उत्तर देणेच टाळले. महाराष्ट्र सिंचन सहयोगमार्फत विखे यांना निमंत्रण देण्यात आले होते का, असे विचारल्यावर मोरे यांनी स्थानिक संयोजकांकडे बोट दाखविले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनी संयोजकांना उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांना आणण्याची जबाबदारी सोपविली होती.
विशेष म्हणजे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काब्दे यांनीही विखे यांच्या नावाला आक्षेप घेतला नाही. निळवंडे व भंडारदरा धरणांमधून पाणी सोडण्याचा विषय आल्यावर हरकत घेणाऱ्यांमध्ये विखेही होते. तेव्हा त्यांनी व्यापक भूमिका घेतली नसल्याचा आरोप काब्दे यांनी घेतला. सिंचन परिषदेत डॉ. काब्दे यांचेही व्याख्यान होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
नांदेडला आज सिंचन परिषद
जायकवाडी धरणाला हक्काचे पाणी देण्याच्या विरोधात केल्या जाणाऱ्या ‘कोल्हेकुई’त सहभागी झालेले कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उद्या (मंगळवारी) नांदेडला होत असलेल्या सिंचन परिषदेचे उद्घाटक आहेत.

First published on: 21-01-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of irrigation conference radhakrishna vikhe