हुडकेश्वर-नरसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साडेचारशे एकर जमीन महापालिकेच्या ताब्यात येणार असून चौदा हजार घरांचा संपत्ती कर मिळणार आहे. आर्थिक संकटात होरपळत असलेल्या नागपूर महापालिकेची स्थिती सुधारण्यास त्यामुळे मोठा आधार मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी एक एप्रिलपासून राज्यातील महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी सुरू केली. त्यास व्यापाऱ्यांनी विरोध केली. महापालिकेला जकातीपासून उत्पन्न मिळत होते. जकात बंद झाली. स्थानिक संस्था करापासून मिळणारे उत्पन्नही कमीच असल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीला फटका बसला.
कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळणे बंद झाले. त्यातच शासनाने कर्ज घेण्यास परवानगी नाकारली. उत्पन्न अत्यल्प, कर्ज नाही. त्यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली. कर्मचाऱ्यांना वेतन देणे दुरापास्त झाले. विकास कामांना कात्री लावावी लागली. राजकीय कोंडी होत असल्याचे पाहून महापालिका वेळीच सावध झाली.
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर जोर दिला जाऊ लागला. संपत्ती व इतर करांचे नव्याने निर्धारण केले जात आहे. कर वसुलीवर जोर दिला जात आहे. त्यामुळे महापालिका थोडी सावरली. नामुष्की टळली असली आर्थिक स्थिती उत्तम नाही. ती बळकट करण्याचे प्रयत्न सुरूच असताना हुडकेश्वर-नरसाळा ही गावे महापालिका हद्दीत शासनाने समाविष्ट केली. प्रारंभी हे डोईजड वाटत असल्याने नाखुषीने ही गावे समाविष्ट करण्यास महापालिकेने परवानगी दिली. मात्र, आता आर्थिक डोलारा मजबुत करण्यासाठी महापालिकेला ही पर्वणीच ठरली आहे. हुडकेश्वर-नरसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक स्थळ व खुली अशी एकूण साडेचारशे एकर जमीन महापालिकेच्या ताब्यात येणार असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय चौदा हजार घरांपासून संपत्ती कर मिळणार आहे.
या ग्राम पंचायतीच्या हद्दीतील चौदा हजार घरांपासून सत्तर लाखाहून अधिक कर वसुलीची अपेक्षा आहे. येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे प्रावधान महापालिकेला करावे लागणार आहे. नफा-तोटय़ाचा विचार नसला तरी येथील कर वसुलीमुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीस बरकत मात्र येणार आहे. वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रथमत: दहा कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे समजते. महापालिका प्रशासनात मात्र उत्साह संचारला आहे. ही गावे ताब्यात आल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महापौर अनिल सोले यांच्या उपस्थितीत कालपासून कर वसुलीला प्रारंभ झाला.
सिव्हिल लाईन्स, महाल वा हनुमाननगर झोन व नेहरूनगर झोन येथून दूर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात कर वसुली केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. २०१३-२०१४ व २०१४-१५ या दोन वर्षांची कर आकारणी केली जात आहे. हुडकेश्वर व नरसाळा गावांच्या विकासासाठी विशेषत्वाने लक्ष दिले जाणार असून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मोकळे भूखंड, भूखंडधारक तसेच घर मालकांना वेळेवर कर भरावा लागेल, असे भावपूर्ण आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2014 रोजी प्रकाशित
नरसाळा-हुडकेश्वरमुळे पालिकेच्या संपत्तीत भर
हुडकेश्वर-नरसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साडेचारशे एकर जमीन महापालिकेच्या ताब्यात येणार असून चौदा हजार घरांचा संपत्ती कर मिळणार आहे.

First published on: 07-05-2014 at 09:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in nashik municipality revenue