एक तपाहून अधिक काळ रखडलेल्या इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी आणि भाम या धरणांच्या कामासाठी शासनाने वाढीव निधी म्हणून ६८ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती आ. निर्मला गावित यांनी दिली आहे.
या निधीमुळे पुनर्वसन व संपादित जमिनींच्या बिलांचा प्रमुख प्रश्न मार्गी लागणार असून धरणांच्या कामास वेग येईल, असा विश्वास आ. गावित यांनी व्यक्त केला. कोरपगावजवळ वाकी खापरी आणि काळुस्तेजवळ भाम या दोन मोठय़ा धरणांची कामे तालुक्यात सुरू आहेत. १५ वर्षांपासून ही कामे रखडली आहेत. बांधकामाच्या सामग्रीत दरवर्षी वाढ होत असल्याने ठेकेदाराला भरूदड सहन करून काम करावे लागत आहे. त्यातच धरणासाठी संपादित जमिनीचे बीलही रखडले होते. पुनर्वसनाच्या कामातही निधी नसल्यामुळे अडथळा आला होता.
या सर्वाची कल्पना आ. निर्मला गावित यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. त्यानंतर अर्थसंकल्पात या दोन्ही धरणांच्या कामांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीपैकी भाम धरणासाठी ५५ कोटी तर वाकी खापरी धरणासाठी १२ कोटी रूपये मिळणार आहेत. वाढीव निधी मंजूर झाल्यामुळे धरणांच्या कामास वेग येण्याची अपेक्षा आ. गावित यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यासाठी या धरणांचे महत्व अधिक असून उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागणाऱ्या या तालुक्यात या धरणांचे काम पूर्ण झाल्यास उन्हाळ्यातही टंचाई भासणार नाही. याशिवाय परिसरातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास या धरणांमुळे मदत होणार आहे. या धरणांचा शेतकऱ्यांना अधिक लाभ होणार असल्याची माहिती आ. गावित यांनी दिली.