नववर्ष स्वागत यात्रांच्या रूपाने गुढीपाडवा या एरवी कौटुंबिक मानल्या जाणाऱ्या सणास सार्वजनिक स्वरूप देण्यात ठाणे जिल्ह्य़ातील शहरांचे, त्यातही विशेषत: डोंबिवली शहराचे मोठे योगदान आहे. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या पुढाकाराने नववर्षांचे स्वागत दिमाखदार शोभायात्रेने करण्याची प्रथा शहरात सुरू झाली आणि त्याचे लगेच इतर शहरांनीही अनुकरण केले. आता तर वर्षांगणिक स्वागतयात्रांचे स्वरूप आणि व्याप्ती वाढत असून त्याचा परीघ विस्तारत आहे. यंदा तर अनेक शहरांमध्ये तीन दिवस नववर्ष स्वागत यात्रांचा जल्लोष होणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता यंदा अनेक स्वागत यात्रांमधून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने मतदान करण्याचा प्रचार स्वागत यात्रांमधून केला जाणार आहे. मुंबई-ठाण्यात २४ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक चांगला मुहूर्त मिळाला आहे.
डोंबिवलीपाठोपाठ ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्येही उत्साहाने स्वागत यात्रा निघू लागल्या आहेत. महारांगोळी, गाण्यांच्या मैफली, विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या शहरवासीयांचा सत्कार, गरजूंना मदत असे विविध उपक्रम आता स्वागत यात्रांच्या निमित्ताने राबविले जात आहेत. तरुणांचा वाढता सहभाग हेही स्वागत यात्रांचे वैशिष्टय़ आहे. कारण धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे संमेलन असे बहुतेक ठिकाणी स्वरूप असते. स्वागत यात्रा त्यास अपवाद आहेत. धार्मिक उपक्रमांना सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात स्वागत यात्रांचे मोठे योगदान आहे. सर्वसाधारणपणे घराच्या दारापुरत्या सीमित असणाऱ्या रांगोळी कलेला मैदानाच्या कॅनव्हासवर आणून महारांगोळीचे स्वरूप देण्यातही गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रा कारणीभूत ठरल्या. खरेतर दिवाळीनिमित्त भरविल्या जाणाऱ्या प्रदर्शनांमधून खूप पूर्वीपासून रांगोळी चित्रांचे प्रदर्शने भरविली जात आहेत. मात्र गुढीपाडव्याने सामूहिक सहभागाने मैदानभर पसरलेल्या महारांगोळ्यांचे दर्शन घडविले. संस्कार भारती, रंगवल्ली परिवार आदी संस्थांनी रांगोळी चित्रकलेची शिबिरे भरवून अनेक कलावंतांना मार्गदर्शन केले. त्यामुळे स्वागत यात्रा मार्गावर अनेकजण उत्स्फूर्तपणे रांगोळी टाकू लागले आहेत.