चीनचे अध्यक्ष झि जिनपिंग यांच्या सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये रेल्वेसंदर्भात सहकार्याचा करार होण्याची शक्यता असल्याची माहिती चिनी वकिलातीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भारतीय रेल्वेमध्ये बांधकाम आणि देशभर पसरलेल्या रेल्वे यंत्रणेची देखभाल या क्षेत्रात सहकार्य करण्याची शक्यता तपासण्यासाठी चीनने एक पथक यापूर्वीच भारतात पाठवले होते. चीनचे अध्यक्ष सप्टेंबरमध्ये भारतात येतील, त्यावेळी रेल्वे क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे, असे चीनचे भारतातील वाणिज्यदूत जनरल लियू यूफा यांनी ‘सीआयआय’च्या कार्यक्रमादरम्यान सांगितले.
गेल्या वर्षी चीनच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भारताला भेट देऊन या संदर्भात चर्चा केली. त्यांच्या या भेटीत सध्याच्या रेल्वे मार्गावर रेल्वेगाडय़ांची गती वाढवणे, अवजड मालाच्या वाहतुकीबाबत प्रशिक्षण आणि रेल्वे स्थानकांचा विकास आदींवर चर्चा झाली.
कालबाह्य झालेल्या रेल्वे यंत्रणेची देखभाल करण्यात काय त्रास होतो, याचा चीनने पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. ज्या चीनमध्ये रेल्वे गाडय़ा ताशी ९० किलोमीटर या गतीने सुरू झाल्या, त्याच देशात एका तासाला तीनशे किलोमीटर इतक्या वेगाचा पल्ला गाठणाऱ्या ‘बुलेट ट्रेन्स’चे देशव्यापी जाळे पसरले आहे. त्यामुळे चीनच्या या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेण्यासाठी भारत चीनचा ‘टेस्टिंग ग्राऊंड’ म्हणून विचार करू शकतो, असे यूफा म्हणाले. याशिवाय, भारतभरात पसरलेल्या रेल्वेच्या सध्याच्या यंत्रणेची दुरुस्ती (ओव्हरहॉल) करण्याच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत, तसेच अतिजलद रेल्वेगाडी सुरू करण्याबाबतही दोन्ही देश आराखडा तयार करू शकतात असे मत त्यांनी नोंदवले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jul 2014 रोजी प्रकाशित
रेल्वेच्या विकासासाठी भारत-चीन सहकार्य
चीनचे अध्यक्ष झि जिनपिंग यांच्या सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये रेल्वेसंदर्भात सहकार्याचा करार होण्याची शक्यता असल्याची माहिती चिनी वकिलातीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
First published on: 22-07-2014 at 06:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India china co operation for the development of the rail